गांगोवाडीत स्व. बुवा रामचंद्र लाड यांच्या २५व्या पुण्यस्मरणानिमित्त भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम;
सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांची उपस्थिती
फोंडाघाट
गांगोवाडी येथे बुधवार, ६ ऑगस्ट रोजी स्व. बुवा रामचंद्र लाड यांच्या २५व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री. विलास लाड व कुटुंबियांनी केले असून दिवसभर ठिकठिकाणाहून आलेल्या भक्तजनांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ग्रंथवाचनाने होणार असून त्यानंतर स्थानिक भजने सादर केली जातील. दुपारी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध गायक बुवा अमेय आर्डकर आणि पुरुषोत्तम परब यांचे भावपूर्ण गायन सादर होणार आहे. त्यांना साथ संगत महेश परब व मिलिंद लाड (हार्मोनियम) आणि संतोष लाड (तबला) यांची लाभणार आहे.
कार्यक्रमाची सांगता संतोष लाड व समुर लाड यांच्या सुमधुर गायनाने होणार आहे. यानंतर भजनी बुवा व मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, सर्व मान्यवरांना सन्मानचिन्ह अजित नाडकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
संवाद मीडियातर्फे बातमी देताना अजित नाडकर्णी यांनी सर्वांनी या पावन स्मृतीदिनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन केले आहे.
