१६ वर्षांची सैनिकी सेवा पूर्ण करून ‘लान्स नायक’ संदेश पालकर सेवानिवृत्त; आजही २९ जणांच्या संयुक्त कुटुंबात जपतोय कुटुंबसंस्थेचा वारसा
हळदीचे नेरूर (तालुका: वेंगुर्ला)
येथील सुपुत्र लान्स नायक संदेश बबन पालकर यांनी तब्बल १७ वर्षांची यशस्वी सेवा पूर्ण करून भारतीय सैन्यातून ३१ जुलै २०२५ रोजी सेवानिवृत्ती स्विकारली आहे.
संदेश पालकर यांचा जन्म २८ जून १९८७ रोजी हळदीचे नेरूर येथे झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, हळदीचे नेरूर येथे पूर्ण केले. ११वी-१२वी शिक्षण माणगाव महाविद्यालयात झाले तर पदवी त्यांनी जे. बी. नाईक कॉलेज, सावंतवाडी येथून घेतली.
१६ जुलै २००८ रोजी भारतीय सैन्यात सिग्नल रेजिमेंटमध्ये भरती होऊन त्यांनी देशाच्या विविध भागांमध्ये सेवा बजावली. त्यामध्ये जोधपूर (राजस्थान), गांधीनगर (गुजरात), बांदीपोरा (जम्मू आणि काश्मीर), अमृतसर (पंजाब), गुवाहाटी (आसाम), मथुरा (उत्तर प्रदेश), श्रीगंगानगर (राजस्थान), पुणे (महाराष्ट्र) अशा देशभरातील विविध ठिकाणी त्यांची नेमणूक झाली. शेवटचे कार्यस्थळ जबलपूर (मध्य प्रदेश) येथे होते.
‘लान्स नायक’ या पदावरून ते सेवानिवृत्त झाले असून सध्या ते सावंतवाडी येथे वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे, आजच्या विभक्त कुटुंबपद्धतीच्या युगातही पालकर यांचे एकत्रित २९ जणांचे कुटुंब एकत्र राहते, ही गोष्ट विशेष प्रेरणादायक ठरते.
संदेश पालकर यांच्या देशसेवेबद्दल संपूर्ण कोकणात अभिमान व्यक्त केला जात असून त्यांच्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

