सावंतवाडीत वाढीव वीजबिल आणि स्मार्ट मीटरविरोधात महाविकास आघाडीचे जनआंदोलन ४ ऑगस्टला;
नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
सावंतवाडी –
स्मार्ट मीटर बसवण्याच्या सक्तीविरोधात तसेच वाढत्या वीजबिलांच्या मुद्द्यावर संतप्त नागरिक येत्या ४ ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरणार आहेत. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली हे जनआंदोलन होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी यामध्ये सक्रिय सहभाग घेणार आहेत.
स्मार्ट मीटरमुळे वीजबिलामध्ये मोठी वाढ झाली असून, पूर्वी ८०० रुपये भरत असलेल्या ग्राहकांना आता ३००० रुपयांपर्यंत बिल येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या यंत्रणेचा फायदा एका खासगी कंपनीला मिळतो असून, सामान्य ग्राहकांची आर्थिक लूट सुरू आहे, असे लोकांचे म्हणणे आहे.
“स्मार्ट मीटर म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला,” अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. प्रशासनाने ही सक्ती त्वरित थांबवावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
जर शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल, असा इशाराही आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे. नागरिकांच्या हितासाठी होणाऱ्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

