साटवाडी चेक पोस्ट वादात; ट्रॅफिक पोलिसांनी खोट्या परवानग्या दाखवत अवजड वाहनं पार्किंगचा निर्णय, कोर्टाच्या आदेशाला दिला सुरुंग?
बांदा,
साटवाडी सीमारेषेवरील चेक पोस्ट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पुणे येथील सुवर्ण बिल्ट कॉन कंपनीने सद्भाव इंजिनियरिंग आणि अदानी कंपनीकडून ८० कोटी रुपये मिळावेत यासाठी वर्ष २०२१ मध्ये सावंतवाडी न्यायालयात दावा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, पैसे मिळेपर्यंत ही जागा सुवर्ण कंपनीच्या ताब्यात राहणार आहे.
अशा स्थितीत ट्रॅफिक पोलिस रत्नागिरी यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनं या चेक पोस्टवर पार्क करून ठेवण्याचा निर्णय घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी सुवर्ण कंपनीने परवानगी दिल्याचे सांगितले असले तरी, सुवर्णच्या अधिकाऱ्यांनी ३१ जुलै २०२५ रोजी कोणताही संपर्क झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पोलिसांनी खोटे बोलून चुकीचा निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे.
याशिवाय, मागील वर्षीच्या अनुभवातून वाहनचालकांसाठी शौचालय, पाणी, अन्न यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता निर्माण झाली होती. हे ठिकाण धार्मिक दृष्टिकोनातूनही महत्वाचे असल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
सीए साईप्रसाद मंगेश कल्याणकर यांनी म्हटले आहे की, NH-66 आता फोर-लेन झालेला असल्याने ट्रॅफिक जाम किंवा समोरासमोर अपघात होण्याची शक्यता नाही. त्यामुळे चेक पोस्टवर गाड्या पार्क करण्याचा कोणताही औचित्य नसून, हे केल्यास न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होईल. त्यांनी कोर्टाची परवानगी घेणे आवश्यक असून, तसे न केल्यास कोर्टात अवमानाचा खटला दाखल केला जाऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

