कणकवली रेल्वे स्टेशनवरील मूलभूत सुविधांचा अभाव;
कोकण रेल्वे प्रवासी समितीची खासदार नारायण राणेंकडे तातडीने उपाययोजनांची मागणी
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असून वर्षभर देशभरातून पर्यटक येथे येत असतात. मात्र, कणकवली रेल्वे स्टेशनवर आवश्यक प्रवासी सुविधा नसल्याने पर्यटक व स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत कोकण रेल्वे प्रवासी समितीने खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागण्या सादर केल्या आहेत.
या निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
१) फलाट क्रमांक दोनवरून बाहेर पडण्यासाठी जवळच रिक्षा स्टँडची सोय करावी.
२) सध्या एकच तिकीट खिडकी कार्यरत असून, दुसरी कायमस्वरूपी खिडकी सुरू करावी.
३) स्टेशन परिसरात एटीएमची सोय उपलब्ध करून देण्यात यावी; सिंधुदुर्ग बँकेचे एटीएम सुरू करावे.
४) प्रवाशांसाठी शेड आणि स्वच्छतेची योग्य व्यवस्था असावी.
५) प्लॅटफॉर्म १ वरून २ वर जाण्यासाठी फक्त एकच जिना असून, आणखी दोन जिन्यांची गरज आहे.
६) जेष्ठ नागरिक व अपंग प्रवाशांसाठी उतरत्या जिन्याची व्यवस्था करावी.
या मागण्या कोकण रेल्वे प्रवासी समितीचे अध्यक्ष सुरेश महादेव सावंत यांनी मांडल्या असून, लवकरात लवकर उपाययोजना व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

