सिंधुदुर्ग सैनिक स्कूलमध्ये ‘स्मार्ट किचन’ची वाटचाल – ऑटोमॅटिक चपाती मशीनचे उद्घाटन
आंबोली
सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली येथे विद्यार्थ्यांच्या पौष्टिक आहारासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, आता शाळेतील विद्यार्थ्यांना गरमागरम चपात्यांचा पुरवठा अत्याधुनिक चपाती मेकिंग मशीनद्वारे केला जाणार आहे.
गुजरातहून मागवलेली ही पूर्णपणे ऑटोमॅटिक मशीन ताशी 1,000 चपात्या तयार करण्याची क्षमता ठेवते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत आणि ताज्या चपात्यांसह सकस आहार मिळणे शक्य होणार आहे. या यंत्रामुळे स्वयंपाकघरातील कार्यक्षमता वाढेल आणि आहाराच्या गुणवत्तेतही लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास शाळेच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
या चपाती मेकिंग मशीनचे उद्घाटन नुकत्याच एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी शाळेचे कार्याध्यक्ष सुनील राऊळ, कॅप्टन दिनानाथ सावंत, संचालक जॉय डॉन्टस, शिवाजी परब, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, प्राचार्य नितीन गावडे तसेच अनेक पालक आणि मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घेतलेली ही अभिनव पुढाकार सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरत असून, यामुळे विद्यार्थ्यांना नियमित, स्वच्छ व पोषणमूल्य असलेला आहार मिळेल, असा विश्वास पालकांनी व्यक्त केला आहे.

