You are currently viewing भूमिती जीवनाची

भूमिती जीवनाची

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*भूमिती जीवनाची*

 

विद्यार्थी दशेत असताना गणिताची एक शाखा म्हणून भूमितीचा अभ्यास केला होता. भूमिती म्हणजे काय तर रेखा शास्त्र अशी त्याची थोडक्यात व्याख्या करता येईल. आडव्या उभ्या रेषा जोडून तयार होणारा आकृतीबंध म्हणजे भूमिती.

 

जसजशी मोठी होत गेले, तसतसे लक्षात येत गेले की आपले सारे आयुष्यच या भूमितीवर आधारित आहे.

 

आता बघा, जन्माला येतानाच हातांच्या रेषांवर आपलं उभं आयुष्य अवलंबून आहे. आयुष्याची रेषा, शिक्षणाची रेषा अशी आपण हस्तरेषांना नावे दिली आहेत. जीवनात किती प्रवास करणार, परदेश गमन आहे की नाही या आणि अशा सर्व गोष्टी आपणाला हस्तरेषांवरून समजतात. तेव्हा भूमितीतील आडव्या उभ्या रेषा

हे आपलं जीवन आहे असे म्हटलं,तर काही वावगं होणार नाही.

 

दोन समांतर रेषांचा विचार केला, तर कुटुंबातील कर्ता पुरुष आणि त्याची सहचारिणी

या दोन रेषा समांतरच असल्या पाहिजेत. तेव्हाच संसार रथाची चाके सरळ चालतील, नाहीतर रथ कोलमडून पडणारच.

 

चार सरळ रेषा एकमेकांना जोडल्या की चौकोन तयार होतो. कुटुंबातील इतर माणसे म्हणजे या जोडलेल्या रेषा म्हटलं तर काय चुकलं? जितक्या रेषा अधिक त्याप्रमाणे कुटुंब चौकोनी, षटकोनी, अथवा अष्टकोनी अशा विविध आकारांचे होऊ शकते. हम दो हमारा एक हे झालं त्रिकोणी कुटुंब. आम्ही दोघं आणि आमची दोन मुलं हे चौकोनी कुटुंब तर बाकीचे कुटुंब

म्हणजे संयुक्त कुटुंब.

 

प्रत्येक कुटुंबाचे काही नियम असतात. त्या नियमानुसारच कुटुंबातील व्यक्तीला वागावे लागते, नाहीतर कुटुंब व्यवस्था ढासळते. या परिस्थितीला मी असे म्हणेन की कुटुंब हे भूमितीतील प्रमेय आहे. आणि कुटुंबात निर्माण होणाऱ्या समस्या या त्या प्रमेयावरील रायडर्स आहेत.

रायडर्स सोडवताना आपण ज्याप्रमाणे समोरील आकृतीवर काही रेषा वाढवून, किंवा समांतर नव्या रेषा काढून, एखाद्या आडव्या रेषेवर उभा लंब टाकून ज्याप्रमाणे प्रमेयाच्या पायाभूत तत्त्वांचा वापर करून, म्हणजे( त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज १८० अंश असते, दोन समांतर रेषा एकमेकीस कधीच मिळत नाहीत, एका सरळ रेषेवर उभा लंब टाकला की होणारे दोन कोन प्रत्येकी ९० अंशाचे म्हणजे काटकोन असतात इत्यादी)

त्या समस्येचे उत्तर शोधतो तोच प्रकार कुटुंबात निर्माण झालेल्या समस्यांचा गुंता सोडवण्यासाठी आपण अंमलात आणतो.

 

भूमितीतील वर्तुळाचा विचार केला, तर आपलं जीवन हे एक वर्तुळच आहे. आपली दिनचर्या या वर्तुळाच्या परिघावरूनच चालत असते. सकाळ दुपार संध्याकाळ रात्र या त्या वर्तुळाच्या त्रिज्या म्हणावयास काहीच हरकत नाही. निसर्गाच्या वर्तुळानुसार माणसाने त्याच्या दिनक्रमाचे वर्तुळ आखले आहे.

 

दोन दिवसांपूर्वी मी एकटीच आमच्या घराच्या मागील बाजूस डेकवर बसले होते. पाऊस नुकताच पडून गेला होता. घनदाट हिरवीगार राई आणि हवेतील सुखद ओलावा

फार अल्हाददायी होता. परसातल्या त्या मेपलच्या झाडाकडे बघताना माझ्या सहज लक्षात आले की झाडाच्या बुंध्यातून ज्या फांद्या फुटल्या आहेत, त्या कशा अगदी चित्रात काढल्यासारख्या समांतर रेषेत आहेत. एकही फांदी कुठून तरी कशीतरी डोकावताना दिसत नाही. ” अरे या निसर्गाची रचनाही त्या किमयागाराने कशी अगदी भूमितीचे गणित लक्षात घेऊनच केली आहे,” असा विचार माझ्या मनात पटकन डोकावला. खरंच आहे ते. त्या फांद्या समांतर असल्यामुळेच एकमेकांवर पडल्या नाहीत, त्यांच्यातील समान अंतरामुळे त्यांची वाढ चांगली झाली आहे.

 

आयुष्यातील ही अशी गणिते शांतचित्ताने, यशस्वी रीतीने जे सोडवू शकतात, तेच समाधानी, आनंदी जीवन जगू शकतात.

 

अरुणा मुल्हेरकर

मिशिगन

२९/०७/२०२५

प्रतिक्रिया व्यक्त करा