दोडामार्ग सावंतवाडा प्राथमिक शाळा समस्या बाबत तहसीलदार याना पालकांचे निवेदन
दोडामार्ग
तालुक्यातील एकमेव पी.एम. श्री जिल्हा परिषद शाळा सावंतवाडा दोडामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी अधिकृत रस्ता नाही, तर शाळेची जमीन अद्यापही जिल्हा परिषदच्या नावावर अद्याप करण्यात आलेली नाही. या गंभीर समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अखेर स्थानिक ग्रामस्थ व पालकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.याबाबतचे निवेदन दोडामार्ग तहसीलदार याना सादर केले आहे
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक समीर रेडकर, आणि अन्य ग्रामस्थांनी मिळून पालकमंत्री तथा मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांना निवेदन दिले असून, १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता तहसील कार्यालय, दोडामार्ग समोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सदर शाळेची स्थापना सन १९९२ साली झाली असली, तरी शाळेच्या जागेचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. जमीन जिल्हा परिषदच्या नावावर नसल्यामुळे शाळेच्या आवारात कोणतेही विकास काम करता येत नाही. याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी हक्काचा रस्ताही उपलब्ध नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत. दोन वर्षांपूर्वी शाळेची ७४ पटसंख्या होती. सद्यस्थितीत ३१ पटसंख्या आहे. मूलभूत सुविधा अभावी आणि प्रवेश वाटेच्या अडचणीमुळे ही संख्या दिवसेंदिवस घटत आहे. ४३ पटसंख्या कमी झालेली आहे. या विषयावर प्रांत, तहसीलदार, नगरपंचायत, आमदार, जिल्हा परिषद, गटशिक्षण अधिकारी आदींना वारंवार निवेदने देण्यात आली होती. मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पी.एम. श्री शाळा असूनही अशा प्रकारे दुर्लक्ष होत असल्याची खंतव्यक्त केली जात आहे याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या निवेदनावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ.सलोनी म्हावळणकर, समीर रेडकर, मनोज खांबल, गौतम महाले, केशव काळबेकर, ममता नाईक यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी सह्याचे निवेदन सादर केले आहे

