You are currently viewing देखणा श्रावण मंगल श्रावण

देखणा श्रावण मंगल श्रावण

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*देखणा श्रावण मंगल श्रावण*

 

आषाढ लागला. संततधारा कोसळत होत्या. बळीराजा शेतात आणि त्याची बैलं आपल्या ताकदीनिशी राबत होते. अंधारलेलं… पावसाने पार ओलं चिंब करून टाकलेलं .
लागले वारीचे वेध. झाली लगबग पंढरीला माहेरी जायची. तिथल्या मायबापाची गळाभेट घ्यायची.
गोळा होत गेले वारीत रोज वैष्णव. भागवतधर्माची पताका, भगवा ध्वज खांद्यावर घेऊन सजलेल्या दिंड्या निघाल्या.

टाळ चिपळ्या मुखी विठूरायाचा जयघोष, अभंग सारे पंढरीत निनादत होते. चंद्रभागेतिरी संत महंत, भक्तांची मांदियाळी झाली.
दर्शनासाठी आतचर लोचन मायबापाच्या चरणी झुकले तेव्हाच शांत झाले.

वारी विठूरायाचा आशीर्वाद घेऊन परत फिरले.
आता श्रावणाची चाहुल लागली होती.
घरोघरी चैतन्य, आनंद घेऊन श्रावण अंगणी ऊभा राहिला.
वर्षा ऋतुतील देखणेपण घेऊन साजरा, गोजिरा, लाजरा श्रावण आला.

अवनीवरहिरवाईची झालरच पांघरली गेली. ग्रिष्मातील तृषार्त राने वने डोंगर माळ सारे हिरवाईने नटले. ठाई ठाई पानाफुलांना बहर आला. आसमंत सुगंधाने भरले.

ऊन पाऊस हातात हात घालुन लपंडाव खेळू लागली. आभाळात मेघांनी दडवलेला रवीराज मधुनच डोकं वर काढू लागला. प्रकाशाचे सोनेरी दान पसरू लागला. वृक्ष वेली या सुवर्णाचे मुगूट घालुन सजले.

डोंगर माळांनी हे सोने पांघरून घेतले.
कडे कपारीतुन नदी, ओहळ, झरे धबधबे नाचत ऊड्यामारू लागले.
क्षणात ऊन तर क्षणात झिम्माड श्रावणसर असा खेळ रंगला. शेतातली बाळरोपे तरारून डोके वर करू लागली.
बळीराजाचे डोळे लेकरांसाठी स्वप्ने बघू लागले.

कधी कधी आकाशात सुंदर इंद्रधनूची सप्तरंगी कमान धमालच ऊडवून देते. नभी सात स्वर्गिय रंग क्षणभर ऊधळलेले हे सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडतात. सगळीकडे नवचैतन्य आनंद धरतीवर पसरलेला असतो. लावण्यवती वसुंधरा सौंदर्याच्या पखरणीवर रूबाबात मिरवत होती.

श्रावणाचे हे विलोभनीय देखणेपण !किती वर्णन आपण करावे?
हाच श्रावण अंगणात आला कि, अंगण तुळशीवृंदावन सारवले जाते. रांगोळ्या अंगण शोभीवंत करतात.

परडीभर फुले देवघरात जमू लागतात. हार वेण्या इ. देवावर ऊधळण होते. घरची माय आधीच घरे , अंगण, देवघर, दिवे, इ. चकचकीत करून ठेवते. त्यामुळे हे फार मंगलमय व प्रसन्न दिसते.
दारावर तोरणे लटकतात. दिपपूजनाने श्रावण सुरू होतो. मुलांसाठी शुक्रवारी जिवंतीका पूजन होऊन पूरणा वरणाचा थाट होतो. सुवासिनींना चणे ,दूध हळदीकुंकू केले जाते. मुलांना औक्षण करून देवीजवळ आयुष्य मागितले जाते.

लगेचच नागपंचमी येते. नाग शेताची नासाडी करणार्या ऊंदरांना खाऊन शेतकर्याला मदत करतो त्याचे ऋण फेडण्यासाठी वारूळावर लेकी सुना पूजा करतात.

वृक्षांना झोपाळे बांधुन माहेरी लेकींचे कौतुक केले जाते.
असाच भाऊबहिणींचा सण रक्षाबंधन येतो., नारळी पोर्णिमेला सागरपूजा, नारळ अर्पून केली जाते.

शेतकर्याला बरोबरीने मदत करणार्या बैलांचा बेंदूर किंवा पोळा सण साजरा होतो. बैलांना तेल रगडुन अंघोळ, शिंगे माळा अशी सजावट, पाठीवर झुल, औक्षण करुन‌पुरणपोळीचा घास दिला जातो.

श्रावणात प्रत्येक वाराची पूजा, कहाणी, कथा परंपरेने आली आहे. रोजच काहीतरी व्रत पूजापाठ, वैकल्य, रितीरिवाज, रूढी मनापासुन पाळल्या जातात.खुप सणवार येतात. घरात गोडधोड पक्वान्ने बनतात. पाहुणे मित्र मंडळी येतात. एकंदरीतच श्रावण हा मंगल वातावरण घेऊन येतो. ऊत्साह जिव्हाळा बंधूभाव ल वाढवतो. त्यामुळेच तो नवा नवासा, दरवर्षी नव चैतन्य घेऊन येणारा हवाहवासा वाटतो.

भारतात बहुतेक प्रांतात हा असाच मंगलमय आनंदी साजरा होतो.
लेकींना माहेरी जाता येते. मैत्रिणी भेटतात. मंगळागौरी पूजन होऊन फुगडी झिम्मा खेळण्यात मजा येते. जागरण खुपच आवडतं असतं.

सर्वांचाच हा श्रावण आवडता असतो.

अनुराधा जोशी.
9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा