*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*थुईथुई थुईथुई…..*
थुईथुई थुईथुई नर्तन याचे मोतीच सांडती
थयथय थयथय पाऊस धारा तुफान मांडती
गडगड खडखड धडधडधडधड ढगांचे भांडण
थरथरथरथर कापती धारा अंगणी सांडती…
कडकडकडाड बिजली नाचे ढगांना कापते
चाबूक घेऊन हाती आपुल्या जलद चोपते
धडाडधूम त्या ढग पालख्या धावत सुटती
मोती मोती जिकडे तिकडे सरीच ओघळती…
थेंब टपोरे पाणीदार ते चमचम करती
डेरेदार ती झाडे सारी अलगद झेलती
न्हाऊन निघती निथळत सारे आनंदे डोलती
तृणपाती नि उंच माड ते प्राशन करती…
सळसळ सळसळ नागीण धावे फुफाट ते पाणी
सरसर सरसर पाऊसधारा गाती पहा गाणी
मध्येच थरथर मध्येच गरगर वारा ही नाचतो
शिरशिरी येई अंगावरती तुषार उडवितो..
खेळ चालतो मोर नाचतो झाडे ही नाचती
ये रे ये रे भिजव अंगी पावसास सांगती
जिकडे तिकडे पाऊस धारा पाऊस पसारा
लहरी राजा मध्येच नाचत टपटपती गारा…
खडखड दडदड पत्रे वाजती पक्षी भेदरती
निथळती झाडे पानाआड ती आसरा शोधती
भिजून चिंब ओले अंग वसुंधरा ओली
जिकडे तिकडे कलकल कलकल ओलीच
ती बोली…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

