*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.सौ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वळण*
कधीच वेळ नव्हता स्वतःसाठी.
कायम रगाड्यात अडकलेली
संध्याकाळची गडबड,
सासुसासऱ्यांचं हवं नको
सकाळी डब्यांचं वेळापत्रक,
नोकरीची धावपळ
हवी “थोडी विश्रांती”
असं म्हणत म्हणत
वर्षं निघून गेली.
मुलं मोठी झाली,
संसार चहुअंगी बहरला,
पण एक दिवस
अचानक वेळ समोर उभा राहिला,
हातात आरसा घेऊन.
“ही तूच आहेस का?”
त्याचा थेट प्रश्न होता.
तेच केस,
तेच डोळे,
तोच चेहरा
पण कुणाची ओळख पटत नव्हती.
आठवू लागलं —
कधीतरी लिहायला यायचं,
एकटं वाचायला आवडायचं,
पावसात भिजताना हसावंसं वाटायचं…
ते कुठं हरवलं?
तेच एक वळण होतं.
नव्यानं स्वतःकडे वळण्याचं.
स्वतःला समजून घेण्याचं
अपराध मुक्त,थोडी स्वच्छंदी
आज ती पुन्हा लिहते,
ओवते स्वतःला शब्दांमधून.
तिच्या ओळखीचा रस्ता
कुणाला समजेलच असंही नाही
पण तिच्यासाठी
तो आता स्पष्ट आहे.
आणि त्या वळणावर
तिला ती पुन्हा नव्याने सापडते
संपूर्ण, शांत, स्वतंत्र, समाधानी!
©️®️डॉ सौ. मानसी पाटील

