You are currently viewing नागपंचमी

नागपंचमी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*”नागपंचमी”*

 

श्रावणातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे, परिधान करून भक्ती भावाने नागदेवाची पूजा करतात. पाटावर हळद, चंदनाने नाग— नागीण आणि त्यांच्या पिल्लांचे चित्र काढून किंवा मातीचा नाग करून त्याला दूध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पुजतात. गव्हाची खीर, चण्याची डाळ, गुळ यापासून उकडीची पुरणाची दिंड नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. माहेरवाशीणी माहेरी येतात, झाडाला झोके टांगतात आणि सख्यांसोबत झोके घेता घेता मनीची हितगुजेही करतात.

 

नागपंचमीच्या सणाच्या तशा बऱ्याच वेगवेगळ्या कहाण्या आहेत. श्रीकृष्णाने कालिया मर्दन केले तो दिवसही श्रावण पंचमीचा होता. म्हणूनही नागपंचमीचे महत्व पुराणात सांगितलेले आहे.

 

परीक्षित राजाचा मृत्यू तक्षक नागाच्या दंशाने झाला म्हणून जनमेजयाने आपल्या पित्याच्या मृत्युचा सूड घेण्यासाठी यज्ञ आरंभला. त्या यज्ञात सर्पांची आहुती दिली गेली. तेव्हां तक्षकाने(तक्षक नागाने) घाबरून इंद्राकडे जाऊन रक्षण मागितले. इंद्राने जनमेजयाची समजूत काढली आणि “निसर्ग संतुलनासाठी नागांचे रक्षण करावे आणि यज्ञ थांबवावा” अशी विनंती केली. तेव्हांपासून नागपंचमीस नागदेवतेची पूजा होऊ लागली.

 

वारुळाच्या कथेनुसार महिला नागोबाला भाऊ मानतात. भावाच्या रक्षणासाठी बहीण नागाचे पूजन करते. बहीण भावाच्या नात्याचा, प्रेमाचा अविष्कार करणारा हा नागपंचमीचा सण.

 

मात्र नागपंचमीचा सण साजरा करण्यामागचा आपल्या पूर्वजांचा हेतू मात्र खूपच व्यापक होता. जैवविविधतेला वाचवण्यासाठी नागपंचमी प्रामुख्याने साजरी झाली पाहिजे ही कल्पना त्यामागे होती. वारुळे, मुंग्या, सापांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने हा सण पूर्वजांनी सुरू केला आणि त्यात पर्यावरणाचा विचार होता. मातीतली वारुळे ही मुंग्यांची असतात. मातीचा प्रत्येक कण उकरून वाळवी व मुंग्या ही प्रचंड वारुळे बांधतात. या मुंग्यांमुळे मातीची धूप होत नाही. वारुळात काही रिकामी बिळे असतात. नागोबाला वाहिलेले दूध, दिंड हे वास्तविक मुंग्यांचेही पोषण करतात. मातीचे नाग करून वारुळाला पूजनास जाण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे पावसाळ्यात वारुळाची माती वाहून जाते तेव्हा मुंग्या या माणसाने बनवलेल्या मातीच्या नागाची माती वारुळाच्या डागडुजी साठी वापरतात. वास्तविक मुंग्यांनी केलेल्या वारुळात नाग वास्तव्य करतो म्हणूनच *आयत्या बिळावर नागोबा* ही म्हण मराठीत प्रचलित झाली.

 

नाग हा सरपटणारा प्राणी आहे. तो दूध पचवू शकतच नाही हे विज्ञानाने सिद्ध केले आहे आणि पूर्वजांची नागावर दूध वाहण्याची जी प्रथा होती त्यात ते दूध मुंग्यांना मिळावे हा हेतू होता. मुंग्या, वारुळे, नाग आणि नागांमुळे होणारा उंदरांचा नायनाट आणि पर्यायाने पिकांचे रक्षण अशी ती एक साखळी आहे. आपल्या प्रत्येक सणांना वैज्ञानिक पर्यावरणाची पार्श्वभूमी आहे. पण चुकीच्या समजुतीमुळे समाजात चुकीच्या पद्धती निर्माण होतात. मुंग्यांची वारुळे नष्ट होऊ नये या भावनेने मोठ-मोठे मातीचे नाग करून त्यांची पूजा करणे हे न्पर्यावरणास पूरक आहे.

 

नाग हा शेतकर्‍यांचा खरा सखा. उंदरांच्या नियंत्रणाचे काम सापांकडून होते. मुंग्या, जिथे माती असते तिथे एक चौरस किलोमीटर मध्ये ५० टन खतनिर्मिती करतात. मुंग्या, मधमाशा, साप यांचा एकत्रित विचार म्हणजेच समृद्ध, सुपीक शेतीचा विचार आणि त्यावर आधारित हा नागपंचमीचा सण ही पूर्वजांची वैज्ञानिक कल्पकता किती महान आहे!

गारुडी आला की, प्रत्यक्ष नागाची पूजा करून त्यास दूध लाह्या खाऊ घालून त्यांचे जीव धोक्यात आणण्यापेक्षा मातीच्या नागाचे पूजन हे अधिक संयुक्तिक आणि पर्यावरण पूरक आहे. शिवाय किड्या मुंग्यांचे प्राण्यांचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आपल्या संस्कृतीतला एक महान संस्कार आहे.

 

*राधिका भांडारकर पुणे*

प्रतिक्रिया व्यक्त करा