“स्मार्ट मीटरचा विरोध उफाळला: सावंतवाडीत सर्वपक्षीय एकवटले”
“ग्राहकांच्या परवानगीशिवाय मीटर बसविण्यावर संताप; वीज अधिकाऱ्यांना घेराव, दुप्पट बिलांवरून जाब”
सावंतवाडी
सावंतवाडीत आज स्मार्ट मीटर विरोधात नागरिकांचा संताप उफाळून आला. ग्राहकांच्या परवानगीशिवाय वीज कंपनीकडून स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न होत असल्याने संतप्त सर्वपक्षीय नेत्यांनी वीज वितरण कंपनीचे अधिकारी शैलेश राक्षे यांना चांगलाच घेराव घातला. चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आलेले मीटर त्वरित काढून टाकण्याची मागणी त्यांनी यावेळी जोरकसपणे मांडली.
नेत्यांनी असा आरोप केला की, काही ठिकाणी स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ग्राहकांना दुप्पट वीजबिल आले आहे. ही चूक ‘तांत्रिक’ म्हणत अधिकाऱ्यांनी मान्य केली असली, तरी त्यामुळे ग्राहकांवर आर्थिक भार वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी सामान्य नागरिकांना वेठीस धरणे खपवून घेतले जाणार नाही, असे यावेळी ठाम सांगण्यात आले.
ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख निशांत तोरसकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अनेक पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वीज अधिकारी राक्षे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, कोणालाही जबरदस्तीने मीटर लावलेले नाहीत, आणि बिले चुकीची आली असल्यास त्यात सुधारणा केली जाईल. मात्र त्यांच्या या उत्तराने उपस्थित संतुष्ट न होता, अधिक आक्रमक झाले आणि एकमुखीपणे स्पष्ट केले की, “स्मार्ट मीटर नकोच!”
