पालकांचा सकारात्मक प्रतिसाद..
वेंगुर्ले :
रान भाज्यांचे प्रदर्शन, विक्री व पाककला स्पर्धा वेंगुर्ले तालुक्यातील जीवन शिक्षण शाळा, आरवली नं. १ येथे, आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत संपन्न झाली. २६ जुलै २०२५ रोजी रानभाज्यांचे प्रदर्शन, रानभाज्यांची विक्री तसेच पालकांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा डॉ. नेहा गावडे यांच्यावतीने करण्यात आले. त्यांनी पालकांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन केले व प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिके पुरस्कृत केली.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्यांचे आकर्षक स्टॉल्स साकारले. प्रदर्शनातून रानभाज्यांची माहिती आत्मसात केली. विविध प्रकारच्या भाज्यांची ओळख, त्यांचे उपयोग आणि पोषणमूल्य समजून घेतले. या रानभाज्यांची विक्रीही विद्यार्थ्यांनी स्वतः केली, ज्यातून व्यवसायिक कौशल्य व आत्मविश्वास विकसित झाला. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
पाककला स्पर्धेमध्ये १५ स्पर्धक पालकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण रामचंद्र शृंगारे (औषधी वनस्पती व रानभाज्या तज्ज्ञ – कुडाळ) यांनी केले. तसेच त्यांनी उपस्थितांना रानभाज्यांबाबत सखोल माहिती दिली. सुमारे दीडशे प्रकारच्या रानभाज्यांचे ज्ञान असलेले श्री. शृंगारे यांनी पाककलेत त्यांचा उपयोग कसा करता येईल हे पालकांना मार्गदर्शन करून सांगितले.
*या स्पर्धेतील पारितोषिक विजेते:*
प्रथम क्रमांक – साक्षी बाळकृष्ण शिरोडकर, द्वितीय क्रमांक – संजना संजय शेलटे, तृतीय क्रमांक – कुमारी आरती पवार, उत्तेजनार्थ – २ स्पर्धक तर सर्व १५ स्पर्धक पालकांना सहभागासाठी बक्षिसे डॉ. नेहा गावडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक सौ. वैभवी राय शिरोडकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. प्रिया म्हाडगुत यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी डॉ. सौ.नेहा गावडे – अध्यक्षा, शाळा व्यवस्थापन समिती, डॉ. प्रसाद साळगावकर – सदस्य, सौ. साक्षी शिरोडकर – उपाध्यक्ष हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षिका सौ. संजीवनी कोकितकर व सौ. सविता सातपुते तसेच विद्यार्थी, पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
