उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव
“उद्धव साहेब पुन्हा मुख्यमंत्री होतील” – रुपेश राऊळ यांचा विश्वास
सावंतवाडी
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उबाठा) तर्फे सावंतवाडी येथे आयोजित सत्कार सोहळ्यात दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर तसेच अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील विलंबावर जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
कार्यक्रमात बाबुराव धुरी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात महाराष्ट्राच्या जनतेची ज्या प्रकारे काळजी घेतली, ते अभूतपूर्व होते. पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री होतील, असा आमचा ठाम विश्वास आहे.” शिक्षण विभागाच्या उदासीनतेबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अद्याप अकरावीचे वर्ग सुरू न होणे हे विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले.
या सोहळ्यात जिल्हा महिला प्रमुख श्रेया परब, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, माजी सभापती रमेश गावकर, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, तालुका प्रमुख मायकल डिसोजा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनीही आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, “ते पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि समाजातील प्रत्येक घटकाला आधार देतील,” असा विश्वास व्यक्त केला.
या वेळी डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, पत्रकार अभिमन्यू लोंढे, रक्तदान कार्यकर्ते बाबली गवंडे, क्रीडा क्षेत्रातील जावेद शेख, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव, स्मशानभूमीतील कार्यासाठी ओळखले जाणारे मारुती निरवडेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मायकल डिसोजा यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील आणि निशांत तोरसकर यांनी केले.

