विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाला मिळणार मंच – कलंबिस्त येथे ३० जुलैला स्पर्धा
सावंतवाडी
दिशा फाउंडेशन आणि कलंबिस्त इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय वक्तृत्व स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ३० जुलै २०२५ रोजी कलंबिस्त इंग्लिश स्कूल येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.
या स्पर्धेत तीन गटांमध्ये विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार असून, इयत्ता १ली ते ४थी गटासाठी ‘माझा गाव – सुंदर गाव’, ‘माझे स्वप्न’, ‘माझी आई’ यांसारखे विषय, इयत्ता ५वी ते ७वीसाठी ‘मोबाईल हटवा, बालपण वाचवा’, ‘शिवचरित्र – एक संस्काराचा धडा’, ‘पर्यावरण संवर्धन – काळाची गरज’, तर इयत्ता ८वी ते १०वीसाठी ‘रूढी परंपरा व कौटुंबिक हिंसाचार’, ‘सोशल मिडियाच्या चक्रव्यूहात भारतीय विद्यार्थी’, ‘प्रगत तंत्रज्ञान – विमान अपघात’ हे विषय देण्यात आले आहेत.
स्पर्धेसाठी वेळ मर्यादा गटानुसार अनुक्रमे ३ ते ४ मिनिटे (प्रथम गट), ४ ते ५ मिनिटे (द्वितीय गट), आणि ५ ते ६ मिनिटे (तृतीय गट) अशी असेल. प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार असून, तीन उत्तेजनार्थ बक्षिसे देखील दिली जातील. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नावनोंदणी बी. किशोर वाळवेकर (९४२११९१४३५), सौ. विनिता कटविकर (९४०४४३८७५९), दीपक राऊळ (९४२३३०४५१८) यांच्याकडे करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
