कोनशी – असनिये सीमेवरील जंगलात पट्टेरी वाघाचा हल्ला; आणखी एक गाय ठार
सावंतवाडी
कोनशी – असनिये सीमेलगतच्या जंगलात पट्टेरी वाघाने पुन्हा एकदा हल्ला करून गाय ठार केली. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, वन विभागाकडून तात्काळ कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
तीन आठवड्यांत तिसरा हल्ला – ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
असनिये येथील शेतकरी व बागायतदार रवींद्र काशिनाथ काळे हे आपली गुरं चरण्यासाठी जंगलाच्या सीमेलगत घेऊन गेले होते. काजू बागाईतीत काम करत असताना पट्टेरी वाघाने अचानक एका गाईवर हल्ला चढवला. इतर गुरं पळून रवींद्र काळे यांच्याकडे आली तेव्हा एक गाय गायब असल्याचे लक्षात आलं. शोध घेत असताना गाय मृतावस्थेत सापडली.
पूर्वीही दोन गाईंचा फडशा
याच ठिकाणी वीस दिवसांपूर्वी अनंत काशिनाथ काळे यांच्या दोन गाईंचा बळी घेतला होता. यावरून या वाघाने या जंगलात आपलं ठाणं केले असल्याचा संशय बळावला आहे.
वन विभागाकडून पंचनामा; ग्रामस्थांची बंदोबस्ताची मागणी
घटनेची माहिती मिळताच बांदा वनपाल प्रमोद सावंत व वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत पंचनामा केला. मात्र, सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र भीती पसरली असून, वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
