You are currently viewing *खासदार दिलदार है लेकिन कुछ चमचो से लोग परेशान है ;  शिवसेनेतील  अंतर्गत वाद चव्हाट्यावर*

*खासदार दिलदार है लेकिन कुछ चमचो से लोग परेशान है ; शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर*

कल्याण :

आगामी काळात येऊ घातलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, हीच सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपा, मनसे प्रयत्नात आहे, परंतु शिवसेनेने विरोधकांना शह देण्याची रणनीती आखली आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय उलथापालथ होत असतानाच दुसरीकडे शिवसेनेतील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवरून हे प्रखरतेने दिसून आले. शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी खासदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लावलेल्या बॅनरवरून शिवसेनेत कुजबुज सुरू झाली आहे.

 

मल्लेश शेट्टी यांनी श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यावर लिहिलेल्या एका वाक्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘खासदार दिलदार है, लेकिन कुछ चमचो से लोग परेशान है’ या वाक्यामुळे शिवसेनेत वाद समोर आले आहेत. मल्लेश शेट्टी यांनी लावलेल्या बॅनरनं पक्षातील अंतर्गत विरोधकांना टोला लगावला आहे. सध्या हा बॅनर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

 

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे, यातच प्रत्येक पक्ष आपापल्या पातळीने निवडणुकीच्या तयारीला लागलं आहे. डोंबिवलीत याची सुरुवात झाली असून शिवसेना-भाजपा दोघांनी मनसेला खिंडार पाडलं आहे, मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी भाजपाची वाट धरली आहे. मनसेला डोंबिवली शहरात पोषक वातावरण आहे, मागील निवडणुकीत मनसेचे सर्वाधिक नगरसेवक डोंबिवलीतून निवडून आले होते, त्याचसोबत डोंबिवली मतदारसंघाचा काही भाग कल्याण ग्रामीण मतदारसंघात येतो, याठिकाणी मनसेचा एकमेव आमदारही निवडून आलेला आहे. त्यामुळे मनसेला घेरण्यासाठी शिवसेनेने तयारी केली आहे, मात्र इतर पक्षातील नेते शिवसेनेत प्रवेश करत असताना दुसरीकडे पक्षांतर्गत गटबाजीमुळे शिवसेनेला महापालिका निवडणूक आव्हानात्मक असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा