You are currently viewing आठवणीचा कप्प्यात

आठवणीचा कप्प्यात

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*

 

*आठवणीचा कप्प्यात*

 

आज मन थोडं बेचैनच होतं! काय करू कळत नव्हतं! आयुष्यात अनेक सुखदुःखाचे प्रसंग नेहमीच येत असतात! त्यालाच तर जीवन म्हणतात न? पण तरीही मन खूप सैरभैर झालेलं ! विचारात असतांना अचानक भूतकाळात गेले नि

अलगद आठवणींचा कप्पा जादूची किल्ली फिरवल्यागत उघडला आठवणींचे गाठोडे सुटून माझ्या भोवती आठवणींचा एक ढीगच उलगडला गेला

खरंच ह्या कप्प्यात किती आठवणी असतात न संधी मिळाली की त्या सैरभैर होऊन मनाभोवती रिंगण घालू लागतात अशीच एक आठवण—

काही दिवसापूर्वी सुबोध भावेची एक मालिका होती… तुला पाहते रे त्यात नायिका नेहमी दो रुपये बहुत बडी चीज होती है अस म्हणत असते खरंच मी स्वतः हे अनुभवलं आहे

मी नुकतीच मॅट्रिक झाले होते परिस्थितीमुळे पुढील शिक्षणासाठी शहरात जाणे शक्यच नव्हते पण कुणाच्यातरी सांगण्यावरून मी शिक्षक प्रशिक्षण घेण्यासाठी मोर्शीहून अमरावतीला जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे ठरविले तेंव्हा हे प्रशिक्षण घेण्यासाठी एखाद्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे हमीपत्र लागत असे ( आमच्या शाळेत नोकरी देऊ असे) ही औपचारिकता करावीच लागे ज्यासाठी मुख्याध्यापक तयार नसत पण जवळच्या खेड्यातील एक जण असे सर्टिफिकेट देतात हे कळले तिथे जायला दोन रुपये बसचे तिकीट होते म्हणजे एकूण चार रुपये तरी जवळ हवेत

इथे डोळ्याने एक आण्याचे नाणे दिसणे कठीण खुप वाईट वाटत होते वडिलांना! मलाच एक कल्पना सुचली शेजारची सिंधू ताई माहेरी आलेली तिच्या भावाची ही परिस्थिती साधारणचं! सिंधुताईचा माझ्यावर खूप लोभ होता मी तिच्याकडे धावतच तिच्याकडे गेले सगळं सांगितलं तिला तिने लगेच पाच रुपयांची नोट माझ्या हातात कोंबली माझे काम झाले

मी माझे प्रशिक्षण पूर्ण केले गणित व इंग्रजी ह्या माझ्या विषयामुळे मला एका नामांकित शाळेत नोकरी लागली माझे जीवन आनंदी झाले

प्रशिक्षण संपवून परत आले तर सिंधुताईचा भाऊ बदली झाली म्हणून निघून गेलेला! ताईची पुन्हा भेट झाली नाही त्यावेळी आजच्या सारखी संपर्क साधने नव्हती पत्रही फार महत्वाचे असेल तरच लिहिले जायचे

 

पण आठवणींच्या कप्प्यात ते दोन रुपये नेहमीसाठी आहेत जे आठवण देतात—

दो रुपये भी बहुत बडी चीज होती है बाबूजी!

 

 

 

प्रतिभा पिटके

अमरावती ९४२१८२८४१३

प्रतिक्रिया व्यक्त करा