गांधी जिल्ह्यातील कारंजा तालुक्याने घेतला पुढाकार…
अमरावती :
महाराष्ट्र हे ससंपन्न व पुरोगामी राज्य आहे .या राज्यात वर्धा जिल्हा हा महात्मा गांधींचा जिल्हा म्हणून ओळखण्यात येतो. या जिल्ह्यातील कारंजा घाडगे या शहरातील शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्याचे ठरविले आहे.त्यासाठी त्यांनी अमरावतीच्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या मिशन आयएएस या संस्थेच्या प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांना मार्गदर्शनासाठी कारंजा येथे निमंत्रित केले होते.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या चर्चेच्या प्रमुखस्थानी चळवळीत सक्रिय असलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास वानखडे हे होते.
याप्रसंगी मॉडेल हायस्कूल, विवेकानंद शिक्षण संस्था एमसीवीसी संस्था पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे व त्यांचे सहकारी रमेश गोटखडे व चंद्रशेखर आसोले यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी उपस्थित असणाऱ्यांना प्रा.काठोळे यांनी दुसऱ्या वर्गापासून स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती दिली.
तसेच त्यांनी आयएएस, एमपीएससी या परीक्षेची पार्श्वभूमी सांगितली. अनेकांना कलेक्टरची परीक्षा मराठी भाषेत देता येते हे माहीत नाही. तसेच या परीक्षेला बसायला फक्त ३५% गुण लागतात व पहिली परीक्षा पास करायला फक्त २५% गुण लागतात ही माहिती जनमानसापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे असे प्रतिपादन त्यांनी या वेळेस केले.
याप्रसंगी त्यांनी शिक्षण संस्थेच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधान केले. त्यांनी केलेल्या आवाहनावरून कारंजा शहरातील शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन स्पर्धा परीक्षा हा उपक्रम राबवण्याचे ठरविले असून त्याचा शुभारंभ ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा या कार्यशाळेने होणार आहे.
यामध्ये कारंजा शहरातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी एकत्र येऊन त्यांना प्रा.डॉ.काठोळे हे मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय सातत्याने वर्षभर विविध स्पर्धा परीक्षा विषयक उपक्रम राबविण्याचे या सभेमध्ये ठरविण्यात आले.
अशाप्रकारे एका तालुक्यातील शैक्षणिक संस्था एकत्र येऊन संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजन करणारा कारंजा हा महाराष्ट्रातील पहिला तालुका आहे.यावेळी मॉडेल एम सी व्ही सी चे सेवानिवृत्त प्रा.सतीश काळे,मॉडेलचे अध्यापक विनोद चाफले, विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव अजय भोकरे पत्रकार सुधाकर बोबडे व शुभम वानखडे हे उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व सातत्याने वर्षभर स्पर्धा परीक्षा उपक्रम राबवण्यासाठी शहरातील सर्व शैक्षणिक संस्था एकत्र आल्या असून त्यांनी कारंजा शहरातील स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढविण्याचा तसेच गुणवत्ता वाढविण्याचा संकल्प सोडला आहे.
प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
