*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट:२३*
*गटारी*
आल्याआल्याच काकल्याने विचारले, “तुझी गटारी केवा? बुधवारा काय गुरुवारा?” मी म्हटलं,” माझी आणि तुझी असं असतं काय? अरे, अमावस्या गुरुवारी आहे, ती सगळ्यांकरीता.”
“अरे पण गुरुवार शाकाहारी. तुझो झील मात्र बुधवाराच गटारी करतलो, ह्या लिवन् ठेय.” आमच्या चिरंजीवावर घसरत काकल्या म्हणाला.
“माका सांग, ह्यो सण केवा निर्माण झालो? हेका आधार काय?”
मी म्हणालो, “हा सण नव्हेच. पंचांगात या आषाढ अमावस्येला ‘दीप अमावस्या’ असं लिहिलेलं असतं. श्रावण सुरू व्हायच्यापूर्वी लोक आपली मांसाहाराची हौस भागवून हा दिवस साजरा करत असतील, त्याला विरोध कशाला करायचा?”
“पून ज्ये गटारी करतत, ते श्रावण पाळतत काय?” काकल्या तडकला. अर्थात हा कठीण प्रश्न होता, कारण चोवीस तास पिणारेदेखील गटारी उत्साहाने साजरी करतातच. पुन्हा ते दुसऱ्या दिवशी सुद्धा तेच करतात. काकल्याने पुन्हा सुरू केले, “मुळात आमच्या न्हानपणी फक्त मिरगाक कोंबो कापीत. नायतर जावय, पावणे इले की चिकन मटण आसायचा. आता रे काय. चिकन सेंटरार सदाच सांजसकाळ गर्दी; मगे आणखीन गटारी करूची गरजच काय? बरा घराघरात चोवीस तास सोरो घेणारे तयार झालेहत. श्रावणात सकाळी उठान नाम लायलो काय झाला सगळा?”
“तू एवढा त्रास कशाला करून घेतोस?” मी समजावत म्हणालो.
“नाय, आमच्या धर्माक बट्टो लागता. गटारेक बाकीच्ये लोक आमचो सण समाजतत, हेचा दुःख हा. गटारेक प्रतिष्ठा दिव नकास मरे. पूर्वी गावात दोन-चार लोक सोरो पियत्, त्येय चोरून. गरीबी इसराक, प्वाट मारूच्यासाठी त्येंची ती गरज होती. आता चार चाकी घेवन् तेरेखोलाक जावन् पितत. राजरोस सगळा चलता. घरोघर आठवड्यात्सून दोन दिस कोंबडा शिजता. मगे गटारी होयीच कित्याक? बरा हैदोस घालूक येक शिगमो ठेयल्लो हाच. मगे?”
काकल्या बरोबर होता. दीप अमावस्येचा उपयोग श्रावणाच्या स्वागतासाठी होणं गरजेचं आहे. मी काकल्याला म्हणालो, “मग तू काय करतोस अमवास्येला?”
“मी गुरवारा येतोबाच्या देवळात जावन् तयारी करतलंय. पाडव्याक सप्तो बसता मां? वायच् देवूळ झाडीन. देवळात येणाऱ्यांची पायधूळ वायच् माझ्याय पायाक लागात.” काकल्या चालू पडला. कधीकधी वाटतं, उगाच शिकलो. काकल्यासारखं अडाणी रहाण्यात पण गम्मत होती. घरी बसून आम्लेट पाव खावून देवाच्या अस्तित्वाविषयी शंका घेत बसण्यापेक्षा, काकल्याबरोबर देवूळ झाडून गुरवाने दिलेला चहा बटर खाण्यातच अधिक सुख असेल.
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी
9403088802
