नागपूरच्या भिशी ग्रुपचा अभिनव उपक्रम
नागपूर :
कलेक्टर झालेल्या मुलांचा सत्कार एका भिशी ग्रुपने आयोजित केल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का. अर्थातच नाही. पण हा विक्रम नागपूरच्या मराठा भिशी ग्रुपने केलेला आहे. हा उपक्रम आयोजित करून त्यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. रविवार दिनांक 20 जुलै रोजी नागपूर येथील सुप्रसिद्ध श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या भव्य अशा नॅशनल कॉलेजच्या विमलाबाई देशमुख सभागृहामध्ये सकाळी दहा वाजता या भिशी ग्रुपने कलेक्टर झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवला आहे. सत्काराला मा. लेडी गव्हर्नर कमलताई गवई यांना तर निमंत्रित केलेच आहेच. त्याचबरोबर सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांना बोलावून त्यांनी एक समन्वय साधला आहे. यावर्षी कलेक्टर झालेले नागपूर विभागातील मुले यांच्या सत्काराचे नियोजन या दिवशी ग्रुपने केले आहे.
त्याचे असे झाले की मागील जून महिन्यात मला नागपूर वरून या मराठा भिशी ग्रुपचे श्री गजेंद्र जाधव यांचा फोन आला .ते म्हणाले की आम्हाला आमचा मराठा भिशी ग्रुप आहे. आम्हाला तुमचा मी आयएएस अधिकारी होणारच हा स्पर्धा परीक्षेचा कार्यक्रम आयोजित करावयाचा आहे. आमचा 300 लोकांचा ग्रुप आहे. मी त्यांना म्हटले की माझ्या कार्यक्रम ठेवल्यापेक्षा यावर्षी जी मुले कलेक्टर झालेली आहेत. त्या मुलांचा सत्कार ठेवला तो अधिक नाविन्यपूर्ण व नवीन पिढीला दिशा देणारा ठरेल आणि पुढे मी त्यांना असे सांगितले की आम्ही यावर्षी जी मुले आयएएस झालेली आहेत त्यांचा सत्कार अमरावतीला सहा जून 2025 रोजी शिवराज्याभिषेकनिमित्त अभियंता भवनमध्ये ठेवला आहे. आपण या कार्यक्रमाला आलात .तर या कार्यक्रमाचे स्वरूप पाहिले म्हणजे आपल्याला नियोजन करता येईल.
कार्यक्रम अमरावतीला .ही मंडळी नागपूरची .पण जिद्दी आहेत .समाजासाठी काहीतरी करावयाची इच्छा आहे. तरुण मुलांना मार्गदर्शन करण्याची क्षमता आहे. त्यामुळे ही मंडळी सहा जून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अमरावतीला अमरावतीच्या कलेक्टर झालेल्या मुलांच्या सत्काराला नागपूरवरून कारने सकाळी आली . त्यात डॉ. प्रदीप घोरपडे डॉ. श्रीकांत जाचक सर्वश्री हेमंत शिर्के व गजेंद्र जाधव यांचा समावेश होता.पूर्ण कार्यक्रम त्यांनी पाहिला. आमच्या फार्म हाऊसमध्ये त्यांना आम्ही मेजवानी दिली. अर्थातच आमची नियोजन चांगले असल्यामुळे त्यांना कार्यक्रम आवडणे गृहीतच धरले होते.
ही मंडळी नागपूरला गेली. लगेच दोन दिवसात त्यांचा मला फोन आला की सर आम्हाला यावर्षी नागपूर विभागातून कलेक्टर झालेल्या मुलांचा सत्कार करायचा आहे तुमचे गायडन्स पाहिजे. पाहुणे पण तुम्हाला ठरवायचे आहेत. त्याप्रमाणे मी त्यांना नागपूरच्या शासकीय आयएएस सेंटरचा पत्ता दिला. लाखेसरांचा मोबाईल नंबर दिला व त्यांच्याकडून यावर्षी कलेक्टर झालेल्या मुलांची यादी घ्यावयास सांगितले. त्याचबरोबर मा. लेडी गव्हर्नर कमलताई गवई यांना भेटलो व त्यांची 20 जुलै ही तारीख पक्की केली. नागपूरचे अपर आयुक्त श्री राजेश खवले व महाज्योतीचे महासंचालक श्री प्रशांत वावगे यांना कार्यक्रमाची कल्पना दिली. या दोघांचाही होकार आल्यानंतर श्री गजेंद्र जाधव यांना मी त्यांना भेटण्यास सांगितले. माझ्या सूचनेप्रमाणे ते भेटले. कुणी नकार देण्याचे काही कारण अस नव्हते. सर्वांनी होकार दिला.
कलेक्टर झालेल्या मुलांशी त्यांनी संपर्क साधला. आपल्या भागात आपला जन्मभूमीत सत्कार म्हटल्यानंतर नकार कोण देणार ?
आता प्रश्न जागेचा आला होता. नागपुरात मंगल कार्यालयाचे भाडे प्रचंड आहे. मी मग त्यांना श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे धनवटे नॅशनल कॉलेज सुचवले. तिथे विमलाताई देशमुख सभागृह आहे .तिथे माझे कार्यक्रम बरेच वेळा झालेले आहेत. ते प्राचार्यांना भेटले .आणि प्राचार्यांनी त्यांना सभागृह उपलब्ध करून दिले. आणि हा सत्कार रविवार दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 10 वाजता संपन्न होत आहे .
एका भिशी ग्रुपने कलेक्टर झालेल्या मुलांचा सत्कार आयोजित करण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना आहे. भिशी ग्रुप मध्ये लोक एकत्र येतात. ड्रॉ निघतो.स्नेहभोजन करतात. आणि आपापल्या घरी जातात. फार तर सहली काढल्या जातात. पण नागपूरच्या मराठा ग्रुपने भिशीच्या क्षेत्रामध्ये राहून कलेक्टर झालेल्या मुलांचा जो सत्कार ठेवलेला आहे तो निश्चितच नावीन्यपूर्ण अभिनव आहे.
अशाच प्रकारचे पावले विविध शिक्षण संस्थांनी उचलले तर किती चांगले होईल. ही कलेक्टर झालेली मुले साधारणपणे आगस्टपर्यंत त्यांच्या त्यांच्या गावात आहेत. सप्टेंबरमध्ये त्यांचे मसुरीला प्रशिक्षण सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील विविध शिक्षण संस्थांनी विद्यापीठांनी लोकप्रतिनिधी त्यांचे सत्कार ठेवावेत व महाराष्ट्राची आयएएसची टक्केवारी वाढविण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन मी एका प्रसिद्ध पत्रकाव्दारे महाराष्ट्रातील विविध दैनिकांच्या माध्यमातून लोकांना आवाहन केले होते. अगदी पुण्यापासून तर कोल्हापूर पर्यंतच्या वर्तमानपत्रांमध्ये तशा बातम्या छापून आल्या होत्या. पण फक्त एका लोकप्रतिनिधीचा व एका शिक्षण संस्थेचा फोन आला .एवढी उदासीनता आयएएस या परीक्षेच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून आयएएस या क्षेत्रात काम करीत आहोत. आमचेही अनुभव चांगले नाहीत. पण आम्ही हे व्रत स्वीकारले आहे. आणि आमच्या व्रताला मराठा भिशी ग्रुपसारखे लोक प्रतिसाद देत आहेत ही जमेची बाजू आहे.
आपली महाराष्ट्रातील मुले कलेक्टर होतात. खरं म्हणजे जागोजागी त्यांचे सत्कार व्हायला पाहिजेत. त्यांच्या घरी जाऊन त्यांचे सत्कार केले पाहिजेत .सोशल मीडियावर त्याची चांगली प्रसिद्धी झाली पाहिजे .अशा घटना इतर मुलांना प्रेरणादायी ठरतात आणि त्यातूनच भावी आयएएस अधिकारी घडतात.
आपल्याला सर्वांना माहिती आहे .कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळ धनगर समाजातील श्री बिरदेव ढोणे नावाचा मुलगा आयएएस परीक्षा पास झाला आहे. त्याला बहुतेक आयपीएस मिळेल. पण त्याची रँक ही पाचशेच्या पुढची आहे. पण त्याचे एवढे सत्कार होत आहेत. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील विविध सोशल मीडियाने आपापल्या भाषेमध्ये त्याच्यावर रिल्स बनविले आहेत. एक धनगराचा मेंढपाळाचा मुलगा जर आयएएस आयपीएस होऊ शकतो तर मग आपल्या महाराष्ट्रातील जो बुद्धिजीवी वर्ग आहे जो मध्यमवर्गीय समाज आहे त्यांची मुले का होऊ शकत नाहीत ? बिहार आणि उत्तर प्रदेश आजही पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. माझ्या माहितीप्रमाणे बौद्धिकदृष्ट्या महाराष्ट्र संपन्न आहे .आर्थिक दृष्ट्या तर नंबर एकवर आहे. पण जी जाणीव जागृती लोकप्रतिनिधींनी शासकीय अधिकाऱ्यांनी शैक्षणिक संस्थांनी सामाजिक संस्थांनी आयएएस च्या संवर्धनासाठी करायला पाहिजे होती ती केलेली नाही.
डॉ. श्रीकर परदेशी जी. श्रीकांत किरण गिते आशीष येरेकर डॉ. दीपक म्हैसेकर सारखे बोटावर मोजण्या सारखी सनदी अधिकारी आहेत की ज्यांनी आपापल्या जिल्ह्यात दर महिन्याच्या एका विशिष्ट तारखेला स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन या उपक्रमाला खतपाणी घातले आहे.
समाजामध्ये नागपूरच्या मराठा भिसी ग्रुपने या कलेक्टर झालेल्या मुलांचा सत्कार घेऊन एक आदर्श समोर ठेवला आहे आणि या आदर्शाचे अनुकरण जर प्रत्येक जिल्ह्यात झाले तर व या आदर्शाचे अनुकरण लोकप्रतिनिधींनी शैक्षणिक संस्थांनी केले तर महाराष्ट्रातील आयएएसची टक्केवारी वाढल्याशिवाय राहणार नाही.
नागपूरच्या या मराठा भिशी ग्रुपचे करावे तेवढे अभिनंदन कमीच आहे. गुरुवर्य श्री रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे .त्या कवितेमध्ये ते म्हणतात मावळत्या सूर्याने या जगाला प्रश्न केला .माझे काम माझ्यानंतर कोण करेल. कोणीच उत्तर दिलं नाही. हॅलोजनने उत्तर दिले नाही. ट्यूबलाईटने उत्तर दिले नाही.पण एक मिणमिणती पणती म्हणाली .मी माझ्या परीने प्रयत्न करेल. मराठा भिसी ग्रुपचा हा प्रयत्न म्हणजे त्या पणतीसारखा आहे. अशा हजारो पणत्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात पेटल्या तर महाराष्ट्रात आयएएस होणाऱ्यांची संख्या निश्चितपणे वाढेल अशी अपेक्षा आहे. ती पणती आपण पेटवावी अशी लोकप्रतिनिधी व शैक्षणिक संस्थांकडून अपेक्षाही आहे .
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प.
9890967003

