वालावल गावासाठी बंद झालेल्या बस फेऱ्या तात्काळ सुरू करण्याची मागणी – आय. वाय. शेख (सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस
कुडाळ
कुडाळ आगारातून वालावल मार्गावर धावणाऱ्या बंद बस फेऱ्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी वालावल ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांचे प्रतिनिधित्व करत आय. वाय. शेख (सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस) यांनी आगारप्रमुखांना सविनय निवेदन सादर केले.
निवेदनात सांगण्यात आले आहे की, कुडाळ-वालावल मार्गावर पूर्वी नियमितपणे धावणाऱ्या बसगाड्या बंद झाल्यामुळे नागरिकांचे, विशेषतः विद्यार्थी, नोकरदार आणि विक्रेत्यांचे मोठे हाल होत आहेत. बंद झालेल्या बस फेऱ्यांपैकी तीन प्रमुख मागण्या पुढे मांडण्यात आल्या आहेत:
१) सकाळी ०५:५० वा. कुडाळ–वालावल माऊली मंदिर बस फेरी पुन्हा सुरू करावी – ही बस गर्दीच्या वेळी ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर कुडाळला पोहोचवण्यासाठी महत्त्वाची ठरते.
२) दुपारी १२:३० वा. सुटणारी कुडाळ–वालावल माऊली मंदिर फेरी नियमित व वेळेवर चालवावी – शाळा-महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना परतीसाठी ही फेरी आवश्यक आहे.
३) दुपारी १४:१५ वा. कुडाळ–वालावल–कोरजाई फेरी पुन्हा सुरू करावी – १३:१५ ते १५:२० या वेळेत बस नसल्याने विद्यार्थी व इतर प्रवाशांना दोन तास वाट पाहावी लागते.
शेख यांनी निवेदनाद्वारे यासंबंधी तात्काळ कार्यवाही करण्याची विनंती केली असून, यामुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन सुरळीत चालेल व शैक्षणिक आणि आर्थिक हाल टळतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सदर निवेदनाची प्रत विभागीय नियंत्रक व इतर संबंधित अधिकाऱ्यांना देखील पाठवण्यात आली आहे.

