आत्ताच आम्ही दखल घेणार नाही… असे सांगत सर्व याचिका सर्वाेच्च न्यायालयाने लावल्या फेटाळून
नवी दिल्ली :
प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीवेळी झालेल्या हिंसाचाराचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेने करावा, अशी मागणी करणा-या याचिका सर्वाेच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या.मात्र याप्रकरणी आम्ही आत्ताच दखल घेणार नाही, असे सांगत सर्व याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.
ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेला हिंसाचार, तोडफोड आणि राष्टध्वजाच्या अपमान प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली होती. प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे दोन न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमली जावी. तसेच हिंसाचारासाठी आणि तिरंग्याचा अपमान केल्याबद्दल जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत केली होती.
प्रजासत्ताक दिनी शेतकºयांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान राजधानी दिल्लीत परिस्थिती काही काळ नियंत्रणाबाहेर गेलेली दिसली होती. दिल्लीच्या आयकर कार्यालय ते लाल किल्ल्यापर्यंत गोंधळ उडाला होता. पोलिसांवर मोठ्या प्रमाणात हल्ला, सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान आदी प्रकार घडले होते.
सरकारची चौकशी पुर्ण होऊ द्या
याचिकांची सुनावणी सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपण्णा आणि न्या. व्ही. रामसुब्रमणियन यांच्या खंडपीठासमोर बुधवारी पार पडली. सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे, अशी आमची माहिती असून आत्ताच आम्ही या प्रकरणात दखल देणार नाही, सरकारला योग्य ती कारवाई करू द्या, असे मत न्यायालयाने मांडले आहे.