मुंबई
शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी महाराष्ट्र राज्याचे बंदरे व मत्स्य व्यवसाय विकासमंत्री असलम शेख यांची विजयदुर्ग गिर्ये-बरमाणा बंदर जागतिक दर्जाच्या धर्तीवर विकसित होणे संदर्भात मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग गिर्ये-बरमाणासह जिल्ह्यातील रेडी बंदर विकसित करणेबाबत, मच्छिमारांना पॅकेजचा लाभ वैयक्तिक मच्छिमाराला देखील मिळणेसाठी निकष बदलण्याबाबत, तसेच जिल्ह्यातील बंदरे विकास व मच्छिमारांच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली.
सिंधुदुर्ग हा एकमेव पर्यटन जिल्हा असल्याने सिंधुदुर्ग व रत्नागिरी समुद्री मार्गावर अलिबागच्या धर्तीवर पर्यटनाला चालना मिळणेसाठी विशेष बाब म्हणुन प्रवासी जलवाहतुक, मालवाहतुक सुरु करण्याची मागणी देखील श्री.पारकर यांनी मंत्रीमहोदय यांच्याकडे केली.
जिल्ह्यातील सर्व मागण्या व समस्या जाणुन घेण्यासाठी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येण्याची विनंती श्री.पारकर यांनी केली. मंत्री असलम शेख यांनी संदेश पारकर यांच्या मागणीनुसार वरील सर्व विषयांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राधान्याने भरगोस विकासनिधी उपलब्ध करुन लवकरच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याचे आश्वासन दिले.
यावेळी श्री.पारकर यांच्यासोबत विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष नितीन जावकर व अन्य उपस्थित होते.