You are currently viewing असेच आगळे वेगळे सोहळे झाले पाहिजेत

असेच आगळे वेगळे सोहळे झाले पाहिजेत

अमरावतीच्या देशमुख परिवाराने घेतला पुढाकार

 

मंगळवार दिनांक 15 जुलैला अमरावतीला एक अभिनव आगळावेगळा सोळा संपन्न होत आहे. संयोजकांनी त्याला आत्मोन्नती सोहळा असे सुरेख असे नाव दिले आहे आणि ते योग्यही आहे.

माणूस जिवंत असताना त्याचे योग्य आदरतिथ्य केले गेले पाहिजे. त्याचा मानसन्मान केला पाहिजे. त्याला आवडणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजेत .म्हणजे त्याला खऱ्या अर्थाने समाधान मिळते. पण सहसा असे होत नाही. कोणत्याही माणूस तो गरीब असो की श्रीमंत त्याच्या नजरेसमोर जर असे सोहळे झाले तर निश्चितच त्याला सुखाने मृत्यू येईल याची शाश्वती आहे.

सर्वसामान्यपणे माणसाच्या मृत्यूनंतर तिसरा दिवस दशक्रिया तेरवी गोड जेवण हे विधी केले जातात.

पण यालाच पूरक असे विधी किंवा उपक्रम माणूस जिवंत असताना केल्या गेले तर त्या माणसाला समाधानाने या इहलोकांचा निरोप घेणे सुखकर वाटू शकते.

मी माझ्या अनेक मित्रांना त्यांच्या आई-वडिलांचा सन्मान स्नेहभोजन ते जिवंत असताना करावयास सांगतो. पण सहसा लोकांना हे पटत नाही. माझे मित्र व अमरावती शहरातील सुप्रसिद्ध वकील एड. प्रदीप महल्ले यांना मी असाच सल्ला दिला होता. त्यांनी तो तंतोतंत पाळला. अमरावती कॅम्प भागातील उत्तम लानमध्ये त्यांनी आई-वडिलांचा हा सन्मान सोहळा पार पाडला . त्यांच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला. आपल्यासमोर लोक जेवत आहेत .गप्पागोष्टी करीत आहेत .आपल्याला भेटत आहेत. शुभेच्छा देत आहेत. त्यांचे मन तृप्त झाले. मृत्यू तो अटळ आहे.तो येणारच. पण असे सोहळे झाल्यामुळे आई-वडिलांना आजी-आजोबांना निश्चितच एक तृप्तता लाभल्याशिवाय राहणार नाही.

आमचे मित्र व महाराष्ट्र शासनांमधून कृषी उपसंचालक म्हणून सेवानिवृत्त झालेले डॉ. मंगेश देशमुख यांनी असाच आगळावेगळा सोहळा त्यांच्या आई सुमनताई कृष्णराव देशमुख यांच्या सन्मानार्थ मंगळवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते पाच या कालावधीमध्ये आयोजित केला आहे. हा सोहळा अमरावतीच्या कॅम्प भागातील शासकीय विश्रामभवनाच्या पाठीमागे असलेल्या नंदनवन कॉलनीमध्ये संपन्न होणार आहे .त्यासाठी श्री मंगेश देशमुख यांनी त्यांच्या नातेवाईक व मित्र परिवाराला आमंत्रित केले आहे.

त्यांच्या आई आता 93 वर्षाच्या आहेत. अगदी ठणठणीत आहे. आवाजही कडक आहे. येणाऱ्या जाणाऱ्याला त्या प्रत्येकाला त्या अनंत कोटी आशीर्वाद देत असतात .शिवाय येणाऱ्या प्रत्येकाला काहीतरी गोड पदार्थ अल्पोपहार किमान चहा तरी देत असतात. याही वयामध्ये त्या काम करण्याची प्रवृत्ती ठेवतात. माझे काम मला करू द्या. त्यामुळे माझी प्रकृती ठणठणीत राहील. असे त्यांचे म्हणणे असते. आणि त्या ती गोष्ट अमलातही आणतात.

डॉ. मंगेश देशमुख हे अमरावती मधील कृतिशील व्यक्तिमत्व आहे. मंत्रालयात मंत्री महोदयांचा पीए राहिलेला हा माणूस सामाजिक बांधिलकी ठेवूनच काम करीत आहे. परिवारातील कोणाचाही मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह त्यावर अंत्यसंस्कार न करता डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाला अर्पण करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे आणि त्याप्रमाणे त्यांचे सासरे तसेच साळा यांचे दुःखद निधन झाल्यानंतर त्यांनी देहदान करून प्रत्यक्ष देहदान चळवळीला हातभार लावला आहे.

त्यांच्या आईचे वय 93 आहे. आईचे नाव सुमन ताई आहे. खऱ्या अर्थाने त्यांचे मन सुमन आहे आणि म्हणूनच आज नाही तर उद्या आई जाणारच आहे पण आईच्या देखत जर लोक आईला भेटले. त्यांना खाऊ पिऊ घातले तर आईला किती समाधान मिळेल ही कल्पना त्यांच्या डोक्यात आली. हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. अर्थातच सुमनताईलाही खूप आनंद झाला .आपल्या जवळचे नातेवाईक आपला मित्र परिवार या निमित्ताने एकत्र येणार. आपल्याशी भेटणार. आपल्याला शुभेच्छा देणार .या गोष्टींनी त्यांच्या हृदयामध्ये आनंदाची लहर निर्माण झाली.

तसं पाहिलं तर हा एक आनंद आहे. आनंद उत्सव आहे आणि तसं पाहिलं तर खऱ्या अर्थाने आईला आनंदाने सुखा समाधानाने प्रसन्न चित्ताने निरोप देण्याचा एक संकल्पही आहे. 93 व्या ही वर्षी त्यांची आई आतापर्यंत काम करीत होती. ठणठणीत आवाजाने लोकांशी बोलत होती आणि आजही बोलत आहे. अशा चालत्या बोलत्या वयामध्ये त्यांनी हा आत्मोन्नती सोहळा घडवून आणण्याचे योजिले आहे. त्यामुळे ते अभिनंदनास पात्रही आहेत.

मला आठवते मी देखील माझ्या आई श्रीमती गंगाबाई विठ्ठलराव काठोळे ह्या जेव्हा मृत्युमुखी पडल्या तेव्हा मी कोणत्याही प्रकारचे विधी न करता अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात आईचे देहदान केले. आईच्या नावाने आमच्या दर्यापूर तालुक्यात व्याख्यानमाला सुरू केली. अमरावतीला सात दिवसांची श्री संत गाडगेबाबा व्याख्यानमाला सुरू केली. आजही हे उपक्रम सुरू आहेत. त्याला लागणारा सगळा खर्च मी एकटाच करतो. मला भाऊ आहेत. बहिणी आहेत .तेही खर्च करू शकतात. पण मी त्यांना तो त्रास देत नाही. त्यासाठी मी एकटाच समर्थ आहे. मला मनोमन हे पटले आहे की अनाठाई खर्च केल्यापेक्षा समाज उपयोगी कार्यात खर्च करणे अधिक चांगले. हे सर्वांनाच पटेल असं नाही. परंपरागत मार्गाने जाणारे अनेकजण आहेत .पण त्यांनीही याचे भान ठेवून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. आई-वडिलांचा आजी-आजोबांचा जिवंतपणे सन्मान करणे हे खरेच गरजेचे आहे आणि त्यांना खऱ्या अर्थाने सुखा समाधानाने उर्वरित आयुष्य देण्यासाठी जगण्यासाठी ऊर्जा देणारेही आहे .आमचे मित्र श्री मंगेश देशमुख यांनी पुढाकार घेऊन आई जिवंत असताना आयोजित केलेल्या या आत्मोन्नती सोहळ्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत.

 

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आय ए एस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा