You are currently viewing प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणात माने कुटुंबीयांना १५ जुलैपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणात माने कुटुंबीयांना १५ जुलैपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

सावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथील प्रिया चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात संशयित प्रणाली माने आणि आर्य माने यांना जिल्हा न्यायालयाने मंजूर केलेल्या अंतरिम अटकपूर्व जामिनाची मुदत आता १५ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. याच प्रकरणात देवगड येथील मिलिंद माने यांनाही १५ जुलैपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सावंतवाडीतील माठेवाडा येथे राहणाऱ्या प्रिया चव्हाण या विवाहित महिलेने आपल्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. या आत्महत्येमागे प्रिया चव्हाण यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्या आई-वडिलांनी केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी देवगड येथील प्रणाली माने आणि आर्य माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

आपल्याला अटक होऊ नये यासाठी प्रणाली माने आणि आर्य माने यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. ८ जुलैला न्यायालयाने या दोघांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता आणि ११ जुलैला या अर्जावर सुनावणी घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार, आज पुन्हा न्यायालयाने या दोन्ही संशयितांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनाची मुदत १५ जुलैपर्यंत वाढवली आहे.

तसेच याच प्रकरणात देवगड येथील मिलिंद माने यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनीही अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने मिलिंद माने यांनाही दिलासा देत १५ जुलैपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा