*कथा,विज वितरण कंपनीची, व्यथा ग्राहकांची*
.. ॲड नकुल पार्सेकर, ग्राहक व अशासकीय सदस्य, ग्राहक संरक्षण परिषद, सिंधुदुर्ग.
विज वितरण कंपनीचे अधिकारी किती बेजबाबदार वागतात याचा अनुभव मी गेले पाच दिवस घेत आहे. माझ्या माजगाव येथील जुन्या बंगल्यात डॉक्टर दांपत्य भाड्याने रहाते. पाच दिवसापूर्वी त्यांचा फोन आला, की वरच्या मजल्यावर व्होल्टेजची समस्या आहे. साठ व्होल्टेजचा दिवा पण झिरोच्या बल्ब सारखा पेटतो. तसेच काही स्विच बंद केल्या तरी मिणमिणत्या लाईट पेटत रहातात. काही दिवे गेले पण. इ. इ.
मी प्रत्यक्ष पहाणी केली आणि त्या भागातील लाईनमन श्री टपने यांना फोन केला. ते म्हणाले मी कामावर आहे. आटोपल्यानंतर येतो. मी त्यांना म्हणालो, ठिक आहे. अडीच तासानंतर हे महाशय आले. त्यांनी जी सर्व्हिस वायर खाली आलेली होती ती वर केली. मी त्याला सांगितले अरे बाबा एवढ्याने मुळ समस्या दुर होणार नाही. तो म्हणाला हा संगळ्याची डायरेक्ट समस्या आहे. तुम्ही साहेबांशी बोला असे सांगून निघून गेला. मी इतर चार घरात जावून चौकशी केली तर कुणाचीही समस्या नव्हती.
त्यानंतर उपकार्यकारी अभियंता आदरणीय राक्षे यांना फोन केला पण त्यानी प्रतिसाद दिला नाही. सावंतवाडीच्या विज वितरण कंपनीत गेलो व तेथील अंटेन्डस मुलीला फोन करायला सांगितले तो त्यांनी घेतला व त्याना गांधींगिरीच्या भाषेत विनंती केली. ते म्हणाले की उद्या सकाळी मी परब नावाचा माणूस पाठवून चेक करायला सांगतो. मधल्या काळात माझा नेहमीचा तज्ञ इलेक्ट्रेशियन जो गोव्यात मोठमोठ्या टाॅवरची कामे करतो त्याला पाचारण करून घरातील सर्व वायरिंग वगैरे चेक केले. त्याने मला सांगितले की घरात काही समस्या नाही. पोलवर न्यूट्रल झाल्याने ही समस्या आहे. मी ते टपने नावाचे लाईनमन याना पुन्हा बोलावले व जरा पोलवर चेक करा असे सुचवले पण हे महाशय ऐकायला तयार नाही. तोंडात गुटख्याचा चोथा भरून ते बोलत होते त्यामुळे मला ते काय बोलतात हे समजत नव्हते.मला हे सहन होत नव्हते. समजा माझ्याकडून काही अपशब्द वापरले गेले असते तर मग कर्तव्यावरील कर्मचाऱ्याला धमकी, शिवीगाळ म्हणून तक्रार देऊन ३५३ ची कारवाई झाली असती. जसे सावंतवाडीत गेल्यावर्षी पञकार विनायक गवसासारखे अनेकजण कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहे.
त्यानंतर मी आरवली येथे एका साहित्यिक कार्यक्रमात असताना विज वितरण समस्या निवारण्यासाठी जो समुह आहे त्यावर पोस्ट टाकली त्याला राक्षे यांनी आज सोमवारी माणूस पाठवतो म्हणून उत्तर दिले. या राक्षेना मला सांगायचे आहे की आम्ही ग्राहक तुमची अव्वाची सव्वा येणारी विज देयके अंतिम मुदतीपूर्वीच भरतो. आमच्या ग्राहकांच्याच पैशातून तुम्ही गलेलठ्ठ पगार घेता. १९८६ च्या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांना तत्पर सेवा देणे हे तुमचे कर्तव्य आहे. नैसर्गिक आपत्ती आली तर आम्ही समजू शकतो. कर्मचारी हा पण माणूस आहे, याचा अर्थ असा नव्हे तुम्ही माणूसकी सोडून बेजबाबदार वागावे आणि ते आम्ही सहन करावे.
आठ वर्षापूर्वी एका ग्रामीण भागात एका बिचाऱ्या गरीब शेतकऱ्याच्या कर्ज काढून घेतलेल्या दोन म्हशी तुमच्या विज वाहिनी पडल्याने मरण पावल्या होत्या. हा तुमच्याच बेजबाबदार पणाचा परिणाम होता. पेपर मध्ये आलेल्या बातमीच्या आधारे मी तो विषय ग्राहक संरक्षण परिषदेत मांडला व त्या शेतकऱ्याला थोडाफार आर्थिक दिलासा मिळाला.
दोन दिवसांपूर्वी कुडाळ मालवणचे आमदार मा. निलेश राणे यांनी सिंधुदुर्गातील विज ग्राहक तुमच्या या बेजबाबदार वर्तनामुळे कसे हैराण झालेले आहेत तसेच ही व्यवस्था सुधारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विधानसभेत केले. अर्थात त्यांनी ज्या तळमळीने हा विषय मांडला म्हणून तुमच्या अशा कार्यपद्धतीत बदल होईल अशी अपेक्षा करणे मुर्खपणाचे ठरेल.
जुन्या ग्राहकांना व्यवस्थित सेवा द्यायची नाही आणि नवीन जोडण्या द्यायच्या आणि संगळ्याच ग्राहकांची गैरसोय करायची फक्त विज वितरण कंपनीची तिजोरी भरण्यासाठी. नवीन ग्राहकांना जोडण्या दिल्याच पाहिजे याबाबत आमचा आक्षेप नाही पण त्याची क्षमता न वाढवता पाच किलो धान्याची क्षमता असणाऱ्या पिशवीत दहा किलो धान्य कोंबण्याचा हा प्रकार आहे.
मुंबईत प्रकाशगडच्या वातानुकुलित इमारतीत बसून आमच्या पैशावर सुख सुविधा उपभोगणाऱ्या वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जरा महाराष्ट्रातील इतर भागात प्रकाश पडतो की नाही याचा थोडा गांभीर्याने ते विचार करणार आहेत की नाही? ते तिथे बसून भ्रष्टाचार करतात असे मी म्हणणार नाही कारण भ्रष्टाचार सिद्ध करण्यासाठी पुरावे लागतात… आणि भ्रष्टाचार करणारे कधीच पुरावे ठेवत नाही. तुम्ही आम्हां ग्राहकांच्या पैशावर अवश्य मजा मारा,तुमचा तो अधिकार आहे पण आम्ही तुम्ही दिलेल्या बदलानुसार कोणतेही आढेवेढे न घेता मुकाट्याने देयके अदा करतो आणि जर अशी फालतू समस्या निवारण्यासाठी पाच पाच दिवस लागतात असतील तर याला काय म्हणावे. ?
माझ्या सारख्या सजग नागरिकाची ही अवस्था तर सर्वसामान्यांना तुम्ही नेहमीप्रमाणे फाट्यावरचं मारणार नव्हे मारत आहात. आज जर माझी समस्या दूर झाली नाही तर मग मला कायदेशीर मार्गाने आपल्याला धडा शिकवावाचं लागेल.

