कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने काही ठिकाणी अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील सर्वच देश कोरोनाचा सामना करत आहे. मात्र आता धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता कोरोनापेक्षाही जास्त खतरनाक व्हायरस असल्याची माहिती मिळत आहे. एका फंगसने शास्त्रज्ञांची चिंता वाढवली असून तो धुमाकूळ घालू शकतो अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
“कँडिला ऑरिस” असं या फंगसचं नाव असून तो ब्लॅक प्लेगचा प्रसारामधून निर्माण होत आहे. हा फंगस अत्यंत धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे.
शास्त्रज्ञांच्या मते कोरोना व्हायरसपेक्षाही मोठी महामारी आणण्यासाठी हा फंगस सक्षम आहे. त्यामुळेच “कँडिला ऑरिस” हा जास्त खतरनाक ठरत आहे. तसेच याचा प्रसार देखील वेगाने होत आहे. डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन सेंटरच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कँडिला ऑरिस हा अधिक प्रभावी असल्याने त्यावर अँटीफंगल औषधांचा देखील परिणाम होत नसल्याचं पाहायला मिळत आहे.
जमिनीवर खूप वेळ जिवंत राहू शकतो “हा” फंगस
सीडीसीशी संबंधित शास्त्रज्ञांनी या फंगसचा प्रसार रुग्णालयात झाला तर तो खूपच जास्त धोकादायक होईल असं म्हटलं आहे. लंडन इम्पीरिअल कॉलेजमधील महामारी विशेषज्ञ जोहाना रोड्स यांनी “कँडिला ऑरिस” हा जमिनीवर खूप वेळ जिवंत राहू शकतो असं म्हटलं आहे. तसेच रोड्स 2016 मध्ये या फंगसमुळे निर्माण झालेल्या संक्रमणावर ताबा मिळवणाऱ्या टीममध्ये होत्या. तसेच माकडांमुळे याचा संसर्ग होत असल्याने त्याची ब्लॅक प्लेगसोबत तुलना होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.