*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि ग सातपुते यांच्या काव्याचा विनय पारखी यांनी केलेला रसास्वाद*
*मनीची सांत्वना*
आदरणीय भावकवी *वि.ग.सातपुते अप्पांच्या कविता या गूढ अर्थाने भरलेल्या असतात.* त्या कवितेला विविध कंगोरे असतात. आप्पांचे भावकवितेतील शब्दच इतके प्रभावी असतात की कुणीही मराठी भाषा जाणणारा माणूस त्यांच्या शब्दांच्या प्रेमात पडेल. त्यांचे शब्द मनावर राज्य करतात. त्या शब्दांचे गारुड त्या शब्दांचा अर्थ शोधायला भाग पाडतात. त्यांच्या भावकविता रसिक वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतात आणि त्यांच्या विचारांची व्याप्ती वाढवतात. शब्दातल्या भावनेच्या गाभ्याचा संयमी सुरांनी ठाव कसा घ्यायचा याचं सखोल ज्ञान त्यांच्या प्रत्येक ओळीतील त्यांच्या शब्दांमध्ये जाणवतं. अशीच ही त्यांची ‘मनीची सांत्वना’ ही त्यांनी लिहिलेली भावकविता.
ही कविता मी ज्यावेळी वाचली त्यावेळी आषाढी एकादशीचे वारे सगळीकडे वहात होते. आप्पांच्या कवितेला विविध कंगोरे असतात ते लक्षात घेता ही कविता वाचून सहजच एक विचार मनात आला की ज्यावेळी संत ज्ञानेश्वर माउलींनी संजीवन समाधी घेतली त्यावेळी तिथे उपस्थित असलेले त्यांचे गुरु आणि जेष्ठ बंधू संत निवृत्तीनाथ महाराजांच्या मनात नेमके काय चालले असेल. त्यांच्या मनाची अवस्था कशी काय झाली असेल. ज्या शिष्याला त्यांनी आपलं सर्व ज्ञान दिलं तो त्यांचा परमभक्त शिष्य आणि त्यांचा लहान बंधू ज्याला त्यांनी आपल्या अंगाखांद्यावर खेळवले असा ज्ञानदेव आज त्यांच्या आधी संजीवन समाधी घेण्यासाठी मार्गस्थ होत आहे.
सारी संत मंडळी सारा जन समुदाय आळंदी येथील सिद्धेश्वर मंदिराच्या समोर समाधीच्या जागी निःशब्द हात जोडून उभा आहे. तो संजीवन समाधी सोहळा पाहण्यासाठी जो तो डोळ्यात प्राण आणून पाहात आहेत. आकाशात विहरणारे पक्षी आज किलबिलाट करत नाही आहेत. वारा जड अंतःकरणाने जागच्या जागी स्तब्ध उभा आहे. झाडावरची पाने, फुले, झाडांच्या फांद्या मान वाकवून ज्ञानोबांच्या पायी नतमस्तक होत आहेत. निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई यांच्या एका डोळ्यात विरहाचे अश्रू आहेत तर दुसऱ्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. जस जसे ज्ञानदेव समाधीस्थळाकडे जात आहेत तसे तसे निवृत्तीनाथांना त्यांचे सारे गतजन्म आठवत आहेत. जणू त्यांचे मनःचक्षू डोळस होऊन पाझरत आहेत. त्या अनाकलनीय शक्तीतील अंतिम सत्याची प्रखर जाणीव त्यांचं मन ढवळून टाकत आहे. त्यांचा कंठ दाटून आला आहे. हे त्या गतजन्मांचे ऋणानुबंध आहेत. जे भास, आभास, द्वैत, अद्वैत, मोह, माया यांच्या पलीकडले आहेत. साक्षात प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा मागील जन्माचे ऋण या जन्मात फेडावे लागले आहेत ते राहून राहून त्यांना आठवत आहे. वास्तविक वारा ज्यावेळी वाहता असतो त्यावेळी त्याच्या अस्तित्वाकडे आपलं पटकन लक्ष जात नाही पण तो ज्यावेळी शांत असतो त्यावेळी लक्षात येतं की तो नसल्याने किती नुकसान होतंय अशीच अवस्था निवृत्तीनाथांची होत आहे.
अवघ्या आपल्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत श्रीमद्भगवत्गीते सारख्या महान ग्रंथावर प्राकृत मराठी भाषेत भाष्य करून लिहिलेल्या प्रेत्येक अक्षरामध्ये उपमा आणि श्लेष अलंकार वापरून प्रत्येक शब्दाला नाद, रुची आणि सुगंध प्राप्त करून देणारा परमेश्वर समाधिस्त होत आहे. ज्याने जग आणि परमेश्वर यातील अद्वैत याचा चिद्विलासवाद लोकांना समजावून सांगितला आहे तो माझा ज्ञाना आता यापुढे दिसणार नाही आहे. हे वास्तव आहे. ज्याने जगाच्या कल्याणासाठी स्वतः परमेश्वर असूनही त्या ईश्वराकडे पसायदान मागितले असा माझा ज्ञानोबा आज पृथ्वी तत्वातून जल तत्वात, जल तत्वातून तेज तत्वात, तेज तत्वातून वायू तत्वात आणि वायू तत्वातून आकाश तत्वात विलीन होणार आहे. ज्याने जन्म हा दुःखरूपी वृक्षाचा अंकुर आहे. ज्याचा जन्म झाला त्याच्या वाट्याला सुख-दुःख हे येणारच आहे मग मनुष्य अवतार धारण केलेल्या भगवंतांचीही यातून सुटका नाही याच महत्व लोकांना सांगितलं आहे. कारण जन्मांपासूनच कर्म आपल्या मागे लागलेले असते. कर्म, ज्ञान, भक्ती याचा योग सांगून ज्याने सर्व सामन्यांना मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवला आहे असा माझा विश्वाचा माऊली झालेला बाळ क्षणार्धात स्थूल तत्वातून सूक्ष्म तत्वात विलीन होणार आहे. अशा विविध प्रकारचे नाना विचार, त्या जुन्या आठवणी निवृत्तीनाथांच्या मनात उचंबळून येत आहेत आणि ते त्यांच्या मनाची सांत्वना स्वतःच करत आहेत आणि त्यांच्या मनात नकळत शब्द उमटत आहेत…
भोग भोगिले सारे सारे
सरल्या साऱ्या संवेदना…..
सरला बंद पापणीत जन्म
उसवितो मीच आठवणींना…..
उरि सोहळे सुखदुःखांचे
व्याकुळ अंतरी पाहताना…..
बंध, रेशमी प्रीतभावनांचे
छळतेच वास्तव जगताना…..
आज झाले गेले संपले सारे
काय कसे शोधावे ते कळेना…..
उकलेलही सत्य हे कधीतरी
हीच एक मनीचीच सांत्वना…..
ऋणानुबंध हेच गतजन्मांचे
आता तरी कुणा कां कळेनां,….
*************************
*©️वि.ग.सातपुते ( भावकवी)*
‘जय जय राम कृष्ण हरी’
© विनय पारखी, मुंबई

