पुणे – अर्थसंकल्पात हवाई वाहतूक आणि त्यासाठी पायाभूत सुविधांबाबत सकारात्मक आणि प्रगतशील पावले उचलली आहेत. हवाई क्षेत्र देशाच्या प्रगतीसाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे महत्त्वाचे क्षेत्र आहे. ही कायमस्वरूपी सुरू असणारी प्रक्रिया असून अर्थसंकल्पातील निर्णय हे यापैकी महत्त्वाचे घटक असल्याचे मत हवाई वाहतुकीच्या अभ्यासकांनी व्यक्त केले.
हवाई दळणवळणाच्या दृष्टीने बजेटमध्ये घेतलेले निर्णय दूरगामी आहेत. स्वदेशी विमाने उपलब्ध करण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल आहे. तर, हवाई वाहतूक क्षेत्राच्या अनुषंगाने देखील महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अर्थसंकल्पातील विविध बाबींच्या तरतुदी आणि त्यासंदर्भातील निर्णयांचा या वर्षाअखेरपर्यंत हवाई वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
यामुळे हवाई वाहतुकीत देखील वाढ होणार आहे.
येत्या पाच ते दहा वर्षांत हवाई वाहतूक क्षेत्रात भारत महाशक्ती होण्याच्या दृष्टीने ही पावले उचलली आहेत. या मूलभूत पायऱ्या असून, विचारपूर्वक आणि भविष्यवेधी निर्णय असल्याचे हवाई क्षेत्राचे अभ्यासक धैर्यशील वंडेकर यांनी सांगितले.
भारतात प्रवेश करणाऱ्या विविध ‘एन्ट्री’ पॉईंटस असणाऱ्या देशातील सुमारे 32 विमानतळांवर आरोग्याच्या दृष्टीने ‘पब्लिक हेल्थ युनिट’चा विस्तार करण्यात येणार असून, ही बाब आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या अनुषंगाने महत्त्वाची आहे.
नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाल्यानंतर ‘एनआरआय’ आणि देशांतर्गत हवाई वाहतुकीत वाढ होणार आहे. ज्याप्रमाणे गोष्टी नियमित होतील, त्याप्रमाणे याचे बदल दिसतील. याशिवाय काही शहरांतील विमानतळांच्या खासगीकरणाच्या निर्णयामुळे स्पर्धा वाढल्याने ग्राहकांना अधिक चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध होण्यासह सरकारसाठी उत्पन्नाचा स्त्रोत असेल, असे वंडेकर यांनी नमूद केले.