You are currently viewing गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट(२१)*

 

*गुरुपौर्णिमा*

 

काकल्या घरी येऊन बसला होता. दोन दिवसावर गुरुपौर्णिमा होती. मी सहज त्याला म्हटलं, “अरे, परवा गुरुपौर्णिमा आहे. ये हां.”

“तुयां गुरु केवा केलंय?” काकल्याने आचमन केलं. प्रत्येक वेळी पहिल्यांदाच काहीतरी विचित्र विचारण्यात काकल्याचा हात कुणी धरू शकत नाही.

“अरे गुरु काय करायची गोष्ट आहे?” मी.

“नाय तुया बोललंस हूनान इचारतय.” काकल्या.

“अरे गुरुपौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमा. त्यादिवशी आपल्या गुरुजींची आठवण करायची.”

“तुजो गुरु कोण? नाय जयथय गुरु पताळलेहत हून इचारतय.” एकंदरीत काकल्याने मंत्र सुरू केले होते.

“अरे असं बोलू नये.” मी समजावत म्हणालो.

“नाय रे माकाय इत्सा नाय. पून गुरु मानतत, गुरुपौर्णिमा करतत आनि साबून, उदबत्ती असा कायमाय इकतत. पुस्तकांचा याक सोडा. पून वस्तू इकून मोक्ष कसो मेळतलो, ता सांग.” काकल्याने एकंदरीत गुरूंची शोडषोपचार पूजा सुरू केली होती.

“हे बघ गुरु म्हणजे मार्गदर्शक. आपल्याला जो कोणी ज्ञान देतो, माहिती देतो, दिशा दाखवतो; त्यांना आपण गुरु मानतो. जसं तुला माडावर कुणीतरी चढायला शिकवलं, लाकडं तोडायला शिकवलं; ते तुझ्या स्थानी गुरुच आहेत.” मी थोडा लगाम लावीत म्हणालो.

“नाय पून पाडप्यांची गुरुपौर्णिमा होना नाय.”

“व्हायलाच पाहिजे असंही नाही. गुरुप्रती आदर ठेवायला हवा. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. हे बघ, अध्यात्म ज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान मानतात, त्यामुळे तेथे अधिकतने हे केलं जातं एवढंच. एखाद्याला मूळ ज्ञान देणारा जो गुरु असतो, त्याची ते गुरुपौर्णिमेला पूजा करतात. त्या अनुषंगाने माहिती म्हणून पुस्तकं देतात. चांगलं साहित्य असेल म्हणून ते देतात. त्याच्यात त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन असतोच असं नाही.” मी

“असतोच असं नाही, हूंजे असूय शकता मा.” काकल्या आपल्या पूजेत खंड पडू देत नव्हता.

“आपला धर्म, आपली परंपरा आपली संस्कृती जे शिकवते, ते आपण जाणून तरी घ्यायला पाहिजे ना? म्हणून गुरुपौर्णिमेला कुठच्यातरी अध्यात्मिक गुरुचं ज्ञान घेणं योग्य आहे. त्या दृष्टीने मी तुला बोलावतोय. आमच्या घरी ये, आपण जाऊ कुठंतरी.”

“तूकाच गुरु केलंय तर कसा?” काकल्या शेवटचं आचमन करीत होता. मी म्हटलं, “जिथे सुरुवात केलीस, अजून तू तिथेच आहेस. पुन्हा सांगतो, गुरु करण्याची गरज नसते, ज्ञान समजून घेण्याची गरज असते.”

“पून तो गुरू कोन? खरो गुरू वोळखुचो कसो? तो खडे मेळात?”

मला निरुत्तर केल्याशिवाय काकल्या थांबणार नाही, म्हणून मी अखेर गप्प बसलो; तसा काकल्या विजयी मुद्रेने चालू पडला. काकल्याचंच शिष्यत्व पत्करण्यास काय वाईट, असा एक वेडगळ विचार माझ्या मनात येऊन गेला.

 

*विनय सौदागर*

आजगाव, सावंतवाडी

9403088802

प्रतिक्रिया व्यक्त करा