You are currently viewing मायेची भाषा..

मायेची भाषा..

*ज्येष्ठ लेखक मार्तंड औघडे लिखित अप्रतिम लेख*

 

*मायेची भाषा..*

 

_पहिली पासून तिसरी भाषा म्हणून हिंदी असावी की नसावी यावर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे . या भाषेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची राळ उडवत आहेत . खरं ते अगदी खालच्या दर्जावर जाऊन चिखलफेकच करीत आहेत . विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल जणू काही यांनाच काळजी आहे असे दोघेही भासवत आहेत._

_मात्र ज्या बाल विद्यार्थ्यांसाठी हे राजकारण चालू आहे त्या बालकांना हे ठाऊक तरी आहे का की हे सर्व त्यांच्यासाठी सुरू आहे ? ते बिचारे आई वडील ज्या शाळेत घालतील त्या शाळेत निमूटपणे जात आहेत . ज्या प्रमाणे बकऱ्या कोंबड्यांना खुरड्यात डांबून ठेवले जाते अगदी त्याचप्रमाणे या बाल विद्यार्थ्यांची केविलवाणी अवस्था झाली आहे ._

_बालवयात विद्यार्थ्यांच्या मनावर आणि मेंदूवर कोणताही विपरीत परिणाम होता कामा नये असे अनेक मानसोपचार आणि विचारवंतांचे आजवरचे मत आहे._

_मात्र या विचारांना काडीचीही किंमत न देता प्रत्येकजण स्वतःचेच घोडे पुढे दामटत आहे. मुळात विद्यार्थ्यांच्या मनावरील अभ्यासाचे ओझे कमी व्हावे अशी ओरड मागील‌ वीस- तीस वर्षांपासून सुरु असताना त्यावर केवळ थातुर मातुर उपाय करून विद्यार्थी पालकांची बोळवण केली जाते , परंतु पुस्तकांचे ओझे मात्र आजतागायत कमी झाले नाही. उलट शैक्षणिक प्रयोगाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी खेळण्यात या समाज प्रतिनिधींना विकृत आनंद प्राप्त होत आहे की काय अशी पुसटशी शंका येऊ लागली आहे ._

_सुमारे चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी जी शैक्षणिक प्रणाली लागू होती आणि त्यामध्ये जो अभ्यासक्रम होता तोच आजही लागू असता तर आजच्या इतकी भयावह आणि संभ्रमावस्था कदाचित झाली नसती. आज अकरावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना धड नीट वाचताही येत नाही की साधी साधी गणिताची आकडेमोडही करता येत नाही याचे मूळ मी अनेकदा सांगितल्या प्रमाणे अगदी प्राथमिक शिक्षणातच दडले आहे आणि याचा प्रत्यय मला रोजच येत असतो._

_ही परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ नये आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांचे शिक्षण खरेच आनंददायी व्हावे असे जर आपल्याला वाटत असेल तर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या हाती केवळ दोनच पुस्तके असावीत आणि ती म्हणजे भाषा आणि अंकगणित ! आणि हे विषय अधिक पक्के होण्यासाठी त्यांच्या जोडीला अंकलिपी. बालभारतीने काढलेले पहिली दुसरीचे भाषेचे पुस्तक आजही आमच्या स्मरणात आहे . त्यातील मुळाक्षरावरुन सुरू झालेल्या छोट्या छोट्या सचित्र धड्यांचे विस्मरण कधीच होऊ शकत. भाषा शिकविण्याची किती सहज नि सोपी पद्धत होती ती ! त्यातील ‘ घड्याळ बाबा घड्याळ बाबा किती वाजले ‘ , ‘ झुले बाई झुला ‘ , ‘ उघड पावसा ऊन पडू दे ‘ तसेच ‘ नाच रे मोरा ‘ व पुस्तकाच्या अगदी शेवटी , केळीच्या बागा मामाच्या ‘ आणि ‘ दिवाळी आली काका आला, मामा आला ‘ या पहिली ते तिसरीच्या कवितांनी आपल्या पैकी सरसकट सर्वांचेच बालपण समृद्ध केलं . बालपणात जणू काही जगण्याचा सूर गवसला असं म्हटलं तर वावगं ठरू नये . एकमेकांचे सूर एकमेकांत मिळवणारी ही सुलभ सोपी शिक्षण पद्धती काळाच्या उदरात कुठे गडप झाली ?_

_सुमारे पन्नास ते साठ वर्षांपूर्वी ज्यांनी शिक्षण घेतले त्यातील आज कित्येकजण अधिकारी पदावर आहेत तर काहीजण शिक्षणतज्ज्ञ आहेत. ज्यावेळी ही मंडळी नवी शैक्षणिक प्रणाली लागू करतात त्यावेळी त्यांना त्यांनी घेतलेल्या पहिली ते चौथीच्या शिक्षणाचा कसा काय विसर पडू शकतो ?_

_पहिली – दुसरीला ही दोनच पुस्तके ठेवून टप्प्याटप्प्याने पुढे तिसरी चौथीला एक एक पुस्तक वाढवावे . जसे की त्यावेळी आपल्याला तिसरीला ‘ थोरांची ओळख ‘ हे इतिहाचे पुस्तक तर ‘ आपला जिल्हा ठाणे किंवा आणखी कोणता हे भूगोलाचे पुस्तक असे . यामुळे जवळपास सर्वच राष्ट्रपुरुषांची अगदी थोडक्यात परंतू रोचक व ती देखील सचित्र माहिती मिळत असे. शिवाय आपल्या जिल्ह्याचा भूगोल तिसरीतच शिकल्याने विद्यार्थ्यांला त्याच्या जिल्ह्याची पूर्ण माहिती मिळत असे . आजच्या बदलेल्या शिक्षणप्रणाली आणि केंद्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मंडळांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या किती विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्याची पूर्ण माहिती असते ? जिल्ह्याची सोडा त्यांच्या तालुक्याची आणि गेला बाजार गावाची तरी नीट माहिती असते का ?_

_तिसरीच्या ‘ थोरांची ओळख ‘ या पुस्तकाने आमच्या पिढीला आणि आमच्या आधीच्या तीन पिढ्यांना व नंतरच्या दोन पिढ्यांना खऱ्या अर्थाने थोरांची ओळख करून दिली. त्यामध्ये पितामह दादाभाई नौरोजी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक , पंजाबचा सिंह लाला लजपतराय ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, देशसेवक गोपाळ कृष्ण गोखले स्वामी विवेकानंद , देशबंधू चित्तरंजन दास, स्वामी विवेकानंद , स्वामी रामकृष्ण परमहंस , स्वामी दयानंद सरस्वती , डॉ. जगदीशचंद्र बोस , नेताजी सुभाषचंद्र बोस , योगी अरविंद घोष , गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यापैकी किती नावे आजच्या विद्यार्थ्यांना माहीत आहेत . यातील एक जरी नाव विचारले तरी आजचे विद्यार्थी एकमेकांच्या तोंडाकडे पाहतात , हे माझं स्वतःचं निरीक्षण आहे._

_पुढे चौथीला गेल्यानंतर छत्रपती शिवरायांचे छोटेखानी चरित्रच आपल्या हाती पडते आणि ते वाचून मन अभिमानाने भारावून जात असे. आज चित्रपटांमुळे ( विशेषतः हिंदी ) आजच्या पिढीला तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू देशपांडे कळले पण ‘ गड आला पण सिंह गेला ‘, ‘ शर्थीने खिंड लढवली ‘ आणि ‘ बादशहाच्या हातावर तुरी दिल्या ‘ या काव्यमय शीर्षकातून जो रोमांच निर्माण व्हायचा त्याची अनुभूती तद्दन मसालेवाईक ऐतिहासिक चित्रपटांनी येते का ? आणि महत्त्वाचे हा जो अजावर त्या तिसरी चौथीच्या पुस्तकातून आमच्या काळजावर कोरला गेलेला इतिहास आजच्या पिढीच्या निदान कागदावर तरी उरतो का ? त्याच चौथीच्या सामान्य विज्ञानाच्या पुस्तकाने सजीव आणि निर्जीव सृष्टीचे जे आकलन झाले ते आजच्या भल्या थोरल्या जाडजूड पुस्तकांनी होते का हा कळीचा प्रश्न आहे ! हे तर झालं मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत, इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर न बोललेच बरे !_

_या दोन चार पुस्तकातूनच विद्यार्थी ज्ञानसंपन्न होत असे . आणि याचे मुख्य कारण म्हणजे विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम मर्यादित असल्याने तो इतर कला क्रीडा क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवत असे. यामुळे आपोआपच त्याचे शिक्षण आनंददायी होत असे. आज अभ्यासच इतका झाला आहे की त्याला इतर अवांतर उपक्रम करण्यास वेळच मिळत नाही . मग त्याचे शिक्षण आनंददायी कसे होणार ? यासाठी आठवड्यातील एक शनिवार पुरेसा आहे का ? बरं इतका अभ्यास करुन देखील बारावीच्या विद्यार्थ्याला आपल्या देशातील एकाही राष्ट्रपुरुषाचे नाव सांगता येत नसेल तर मग या नव्या शैक्षणिक धोरणाचा उपद्व्याप कशासाठी?_

_सर्वप्रथम विद्यार्थ्याची मातृभाषा सुधारली तरच पुढे तो इतर कोणत्याही भाषेत चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतो. आणि पहिली दुसरीतच त्याचे गणित सुधारले तर त्याला गणिताची गोडी लागून तो पुढे बीजगणितच काय भूमितीची क्लिष्ट प्रमेये देखील यशस्वीपणे सोडवू शकतो. पण हा इतका खोलवर विचार करायला वेळ आहे कुणाकडे ?_

_ही भाषा की ती भाषा यातच जर माध्यमे व्यस्त असतील आणि वारंवार त्याच त्याच बातम्या दाखवून समाजाची दिशाभूल करत असतील तर आपली सामाजिक आणि वैचारिक प्रगती होत आहे हे आपण कोणत्या तोंडाने म्हणू शकतो? या भाषिक राजकारणात आपण विद्यार्थ्यांचा बळी देत आहोत असे नाही का वाटत ?_

_मुळात विद्यार्थ्याला अभ्यासाची गोडी लागून तो पुढे स्वतःहून त्याचा अभ्यास कसा करेल हे पाहणे गरजेचे असताना उगीचच त्याच्यावर नवनवे विषय लादून आपण काय साध्य करणार आहोत ? मातृभाषा – मातृभाषा म्हणून आपण मराठी भाषेचे कितीही ढोल बडवले तरी प्रश्न हा आहे की खरंच का आता आपली मातृभाषा मराठी राहिली आहे ? किती पालक आपल्या मुलांशी शुद्ध मराठीतून संवाद साधतात? त्यांनी त्यांची मातृभाषा जोपासण्यासाठी खरंच काही प्रयत्न केले आहेत का ? आज हिंदी सक्ती विरोधात व मराठीच्या जल्लोषात विजयी मेळावा घेणाऱ्यांनी इंग्रजीच्या ( भाषेच्या आणि शाळांच्या ) अतिक्रमणा विरोधात कोणता मोर्चा काढला होता ? आणि जे हिंदी सक्ती करू इच्छिताहेत त्यांना दहावी नंतर अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मराठी सक्ती करावी असे कधी वाटले नाही का ?_

_तिसरी भाषा कोणती यावर जो वाद सुरू आहे त्याबद्दल मी जेष्ठ साहित्यिक आणि कवी प्रा. प्रवीण दवणे सरांशी चर्चा केली आणि त्यांना विचारले की पहिलीच्या विद्यार्थांना तिसरी भाषा म्हणून कोणती भाषा शिकवावी तेव्हा ते क्षणाचाही विलंब न लावता उत्तरले , मायेची भाषा!_

_त्यांचे हे उत्तर ऐकून मी त्यांच्यापुढे नतमस्तक झालो . आज जिकडे तिकडे द्वेषाचे राजकरण पाहून विद्यार्थ्यांच्या बालमनावर काय परिणाम होत असतील याचा विचार दवणे सरांसारखा एखादाच संवेदनशील लेखक करू शकतो . अशावेळी केवळ विद्यार्थ्यांनाच काय आपल्या सर्वांनाच प्रेमाची – स्नेहाची आणि मायेची भाषा आधी शिकावी लागेल तरच हे भाषेचं गणित सुटेल अन् गणिताची भाषा आत्मसात करता येईल ._

_यासाठी आधी भाषा आवडायला तर हवी ? तरच आपण तिच्यावर मनापासून प्रेम करू शकतो मग ती भाषा मातृभाषा असो की अन्य कोणतीही भाषा. शेवटी पुलंनी म्हटल्याप्रमाणे जो आपल्या भाषेवरती प्रेम करतो तोच इतरांच्या भाषेवरही प्रेम करू शकतो . यासाठी मात्र मायेची भाषा आधी शिकणं गरजेचं आहे , सक्ती करायचीच असेल तर ती मायेची करा , द्वेषाची नव्हे ! तुम्हाला काय वाटतं..?_

 

 

*©* *मार्तंड औघडे*

‌ *( भाईंदर )*

*६ जुलै २०२५*

*९३२४५४०५८६*

प्रतिक्रिया व्यक्त करा