जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना
खरच कारे पांडुरंगा
तूं भेटलास तुकोबाला
काय झालं संभाषण
सांगतोस का रे मला?
खरच कारे विठ्ठला
तूं खाल्लास नैवेद्य नामाचा
काय म्हणाला नामा तुला
तेवढच सांग मला
गोरोबाने तुडवले
स्वतःच्याच लेकराला
खरच सांग देवा तू
रागावला नाहीस त्याला?
जनी दळण दळताना
कोणते अभंग गात होती
तिच्या गाण्यामुळेच तुला
जाग का रे येत होती?
लाखो वारकरी चालतात
करतात किर्तन भजन
त्यांच्याकडे पाहतोस तेव्हा
डोळे येतात कारे भरून?
मुक्ताने केले मांडे
तवा ज्ञानाच्या पाठीचा
तरीही विटेवरी तूं
तसाच का रे उभा?
कनवाळू तूं दयाळू
म्हणती तुजला भक्त
भींत पडे अंगावर
चोखोबाचा होई अंत ।।
तरीही म्हणावे कारे
तुजला दिनदयाळ
याचे उत्तर मजला
कोण बरे देणार?
आम्ही पामर पामर
काय जाणणार लीला
तूं करिसी तेच चांग
ठेवू विश्र्वास त्यावर।।
विठ्ठल,विठ्ठल.विठ्ठल!!!
विद्या रानडे ,
