*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट:२०*
*पांडुरंग हरी*
काकल्या एका वेगळ्याच वेषात आज घरी आला होता. पांढरा शुभ्र सदरा, डोक्यावर पांढरी टोपी, भाळावर बुक्का आणि गळ्यात तुळशीची माळ. शांतपणे येऊन तो बाकावर बसला.
“काय वारीला जायचा बेत आहे का?” मी विचारले.
“अरे येड्या, वारी आता पंढरपुरात पोचत इली.” काकल्या उत्तरला.
“तू गेला नाहीस तो?” मी.
काकल्या सावरीत म्हणाला,” बाबलो माका हुना होतो, चल हून; पून माका समजाना जाव काय नको ता. बरा आता तुयाच सांग, वारयेक जावकच होया काय? हडेच पांडुरंगाची आठवण काढली तर चलाचा नाय काय?”
मी म्हटलं, “न चालायला काय झालं? पण वारीच्या वातावरणात देव अधिक आठवतो, भक्ती अधिक होते; म्हणून जायचं.”
“बऽऽरा, पून चलतच जावक् होया काय? गाडयेन गेला तर?”
“अरे, देहाला थोडे श्रम झालेले बरे असतात. थोडे कष्ट घ्यायचे, सोबत्यांना सेवा द्यायची, गरज पडली तर लोकांकडून करून घ्यायची. जातपात विरहित समूह जीवन आहे ते; म्हणून अनुभवायचं.” मी समजावत राहिलो; पण काकल्या समाधानी नव्हता.
“अरे, पून पंढरपुरातच कित्याक जावक् होया? देव सगळीचकडे आसता मां?”
“हे बघ. जसा अयोध्येत राम, मथुरेत कृष्ण तसा पंढरपुरात पांडुरंग. तिथे वर्षानुवर्ष भक्ती होत आहे, त्यामुळे स्थानमहात्म्य असतं.”
“पून जाणाऱ्या धा-पंधरा लाख लोकांका दर्शन होता? कायतरी खोटा हा.” काकल्या खुसपटं काढीत होता.
“ते काऽऽही खोटं बोलत नाहीत. वारकरी पंढरपुरात जातात, चंद्रभागेत स्नान करतात आणि समोर जो दिसेल त्याला पांडुरंग म्हणून मिठी मारतात. केवढी श्रद्धा आहे ही! ते एकमेकाला माऊली म्हणतात. ‘जे जे दिसे भूत, ते मानी भगवंत’ अशी त्यांची स्थिती असते आणि हे सगळं समजून घेण्यासाठीच वारीतून पंढरपुरात जायचं.” मी अजून समजावले.
“माका आजून एक प्रश्न असा.” काकल्याचे प्रश्न संपले नव्हते. “गळ्यात माळ घालुकच होयी काय? आणि माशे खाणा सोडूकच होया काय? ”
“हे बघ, देवाने काही सांगितलेलं नाही. आपण संतांच्या मार्गाने जायचं. संकल्प केला, व्रत केलं की, मार्ग सोपा होतो. मनात चांगले विचार येत रहातात. आता इतका पेहेराव केलास, तर तर्कट सोडून दे आणि ‘रामकृष्णहरी’ म्हणून बघ. तुला नाहीतर समाजाला तरी फायदा होईलच.” मी त्याच्या डोक्यात हलकेच टाळ हाणला. तो मनापासून हसला. म्हणाला, “समाजणा नाय, तूया माका सुधारतंस, काय मिया तुका सुधारतय.” खोचक कटाक्ष टाकून काकल्या उठला. मी त्याला निरोप दिला. हात जोडीत म्हणालो, “रामकृष्णहरी.”
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802

