You are currently viewing एक झाड वडाचं….

एक झाड वडाचं….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*एक झाड वडाचं….*

 

होय, मी वडच बोलतोय. किती वर्षे झालीत

माझ्या वयाला…? अर्रे! मला सुद्धा सांगता

नाही येणार बरं सुजाता. अगं, आपली कापडण्याची भात नदी. तू यायचीस ना खळ्यात

नदीकाठी अप्पांबरोबर. माझ्या पारंब्या अगदी जमिनीलगत टेकलेल्या.

विस्तारही केवढा प्रचंड. म्हणूनच तुला म्हणालो मी, माझे वय मलाही सांगता येणार नाही. अगं,

मला तर किती पिढ्या खेळल्या या कापडणे गावाच्या माझ्या अंगाखांद्यावर, मलाही नाही सांगता येणार. मी काही एकटाच नाही इथे, तुला माहित आहे. बघ केवढा गोतावळा आहे माझा. माझे भाऊबंध लहान मोठी माझी लेकरे, बघ.. नदीकडेने केवढी दाट वस्ती होती आमची तू पहात होतीसच ना?

 

आमची वडांची दाट वस्ती, शिवाय पिंपळ, लिंब,

बाभळी, जांभळी, म्हातारीच्या फुलांची झाडे, बिट्ट्याची झाडे.. काय नि किती दाट वस्ती होती ग आमची. तू अप्पांबरोबर खळ्यात आली की,

(माझ्या प्रांगणातच अप्पांचे भलेमोठे खळे होते ना?) ज्वारीची उफणणी चालू असतांना दुपारचे

अप्पाही येऊन बसत खाटेवर, माझ्या दाट सावलीत विसावत असत. पांढरे शुभ्र कपडे, डोक्यावर गांधी टोपी. मोठा दिलदार माणूस.

 

तू मात्र खारीसारखी वर माझ्या जमिनीवर टेकलेल्या फांदीवरून वर चढून बसत असे.

बारामहिने येणारी आमची लाल टेंभरे तुला फार

आवडत असत. सारेच माझ्या अंगाखांद्यावर रूळणारे गोकुळ, पोपट, साळुंक्या, मैना, चिमण्या कावळे, व रात्रीची घुबडे या फळांवरच

तर तुटून पडत व मनसोक्त खात असत. तशी

आमची ही फळे फार औषधी बरं! तुला म्हणून सांगतो, अगं, मुळापासून पानांपर्यंत आमची म्हणजे वड जमातीची सारी अंगे औषधी नि उपयुक्त आहेत. आयुर्वेदात त्याचा प्रचंड वापर होतो. वडाचे वाटिका तेल तर केसांना फार गुणकारी.

 

काय गं? किती मी बोलत बसलो बघ. मला

आठवते तुझे आजोबा सीताराम अप्पा देखील

येऊन बसत कधीमधी माझ्या सावलीत. हो ना?

त्यांचे ते पांढरे शुभ्र जटांसारखे केस, भरदार मिशा, हातात मजबूत काठी, खांद्यावर उपरणे.

त्यांना पाहून मला जणू त्यांच्यात माझाच भास

होत असे. जणूकाही ते म्हणजे मीच. म्हणून ते

खाटेवर बसले की मला त्यांच्याशी बोलावे वाटायचे. पण मग त्यांनी मला वेड्यात काढले

असते ना? काही झाले तरी ती ही माझ्या सारखीच वयोवृद्ध मंडळी ना? माझी काही हिंमत

झाली नाही बघ.आजोबा गेले, तुझे वडीलही गेले,

वाईट वाटले बघ. आम्ही मात्र दीर्घायुषी आहोत बरं! तुमच्या पिढ्यानपिढ्या मात्र आमच्या अंगाखांद्यावर खेळतात. खूप छान वाटते तुमची

सेवा करतांना, तुम्हाला भरपूर प्राणवायु पुरवतांना धन्य वाटते बघ.खरंतर आदि काळापासूनच माणूस नद्या व झाडांच्याच संगतीत वाढतो आहे. आमची संख्या जास्त

होती तोवर समृद्धी होती बघ. निसर्ग इतका

लहरी बनला नव्हता. पाऊस काय? सारेच

ऋतू ठरल्या नुसार येत असत.

 

पण तुम्ही लोकांनी वृक्षतोड केली नि स्वत:च्या

नाशाला कारणीभूत ठरत आहात. म्हणतात ना.”

कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ” तसे वृक्षतोड

करून तुम्ही विनाशाकडे जात आहात. खरं ना?

फार बोलतो बाई मी, म्हातारा झालो ना? पण म्हणून काय झाले? माझी जीवनशक्ती काही क्षीण झाली नाही अजून! माझ्या जीवातजीव

असे पर्यंत व त्यानंतरही मी तुमची सेवा करणारंच आहे बरं का?

 

एक भीतीदायक गोष्ट जी तुझ्या मनाच्या तळाशी,

तू एवढी मोठी झाली तरी खोल दडलेली आहे, ती

सुद्धा मला माहित आहे बरं का! सांगू?

अगं, माझ्या अगदी जवळच थोडं पुढे मृतात्म्यांना

टेकण्यासाठी किंवा खांदेकऱ्यांना “विसावा” मिळावा म्हणून एक चौथरा बांधलाय् बघ. थोडा

वेळ तिथे टेकवून मग पुढे नेतात. तुला खळे तर

आवडायचे पण या भीतीमुळे तू यायला घाबरायची, होय ना? अगं, त्यात काय घाबरायचे? आत्मा तर गेलेला असतो. मग त्या

नाशवंत कलेवराला काय घाबरायचे? हे सारे

तुला कळते ग..! तरी तू अजून घाबरतेच मला

माहित आहे. म्हणून तू तेव्हाही खळ्यात, माझ्या

जवळ यायला टाळाटाळ.. करायचीस, हो ना?

जाऊ दे, नको तो अप्रिय विषय.

 

मी अजूनही आहे बरं, ये ना भेटायला. आता फारसे कुणी माझ्या अंगाखांद्यावर

खेळत नाही, झोके कुणी बांधत नाही, खूप एकटा पडलोय ग मी! किलबिल नाही, आवाज

नाही.. रडायला येतं बघ. केवढा वैभवशाली होतो ना ग मी? मीच मला भूतकाळात बघतो तेव्हा,

दिसते, किती सुंदर व डौलदार होतो मी. देखणाही, लालचुटूक फळांनी लगडलेला. पानेपानी बहरलेला. असो. वृद्धपण कुणाला चुकले तर मला चुकणार आहे सांग? तसे तुझे

ही बरेच वय झालेले असणार आता, होय ना?

जाऊ दे, ही चर्चाच नको आता.

 

मी असे पर्यंत एकदा येऊन जा भेटायला. हो..

उद्याचा काय भरवसा गं?

झोपतो बाई आता पाने मिटून. बोलून बोलून

थकलोय ना? अच्छा. बाय बाय.

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा