You are currently viewing सरखेल कान्होजी आंग्रे

सरखेल कान्होजी आंग्रे

*ज्येष्ठ लेखिका शुभांगी गान लिखित “सरखेल कान्होजी आंग्रे” कादंबरीचे डाॅ. सौ प्रज्ञा आपटे यांनी केलेले पुस्तक परीक्षक*

 

सरखेल कान्होजी आंग्रे’ 

अजेय योद्धा’

 

शुभांगी गान यांची ‘सरखेल कान्होजी आंग्रे अजेय योद्धा’ही ऐतिहासिक चरित्रात्मक कादंबरी. नुकतीच ‘अनघा प्रकाशन ठाणे पूर्व’ यांनी प्रकाशित केली. कोकण किनारपट्टीतील अलिबाग ते त्रावणकोर पर्यंत पश्चिम किनारपट्टीवर शिवकाळात सरखेल कान्होजींची सत्ता होती या सागराच्या व आरमाराच्या राजाची ही नोंद आहे.

शुभांगी गान यांनी आजवर तेरा कादंबऱ्या’ सहा कथासंग्रह व दोन बालकादंबरी लिहिल्या असून’ महाराणी पद्मिनी’ ‘सम्राट समुद्रगुप्त ‘थोरले पेशवे’ आणि आता’ कुंभलगडचा महाराणा कुंभा’. ५० प्रकरणे आणि ३७२ पृष्ठांच्या या कादंबरीचा थोडक्यात परिचय आपण करून घेणार आहोत.

ऐतिहासिक कादंबरी लिहिण्यासाठी त्या काळाच्या त्या व्यक्तीच्या इतिहासाचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. त्या काळातील समाज ,तत्कालीन राजकारण ,आणि ज्या व्यक्तीवर कादंबरी केंद्रित आहे तिचे कुटुंब ,नाती, याची माहिती आणि या साऱ्याचे आकलन ,चिंतन लेखकाने केलेले असते. शुभांगी गान यांचा एम ए. चा अध्ययनाचा विषय अर्थशास्त्र असला तरी इतिहास अभ्यासण्याचा त्यांचा छंद त्यांच्या ऐतिहासिक चरित्रात्मक कादंबऱ्यातून जाणवतो. हा वारसा त्यांना त्यांच्या थोरल्या भगिनी सुप्रसिद्ध चरित्र कादंबरीकार शुभांगी भडभडे यांच्याकडून लाभला असावा. शुभांगी भडभडे यांनी आजवर 26 चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिल्या असून महाराष्ट्रात सर्वाधिक चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिणारी लेखिका म्हणून त्यांची नोंद होणे शक्य आहे.

जेव्हा समाज राजकीय दृष्ट्या अस्थिर असतो तेव्हा लोकांना सद्गुणांचे महत्त्व कळावे ,देशाभिमानाची जाणीव बळकट व्हावी, स्वत्वाची जाणीव व्हावी यास्तव ‘वाटे चरित्र त्यांचे |आपण काही तरावया गावे’या उद्देशाने निष्ठावान महापुरुषांची अशी चरित्रे वाचकांना आदर्श व प्रेरणादायक वाटतात .याच प्रेरणेने लेखिकेने हे लेखन केल्याचे जाणवते. स्वतः लेखिकेने प्रास्ताविकात याचा उल्लेख केलेला आहे.

इ.स.१६७० ला शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत आरमाराची कशी उत्तम स्थिती होती आणि ‘आज्ञापत्रात’रामचंद्रपंत अमात्यांनी आरमाराचे जे सखोल विवेचन केले त्याचा संदर्भ देत शिवाजी महाराज, संभाजी राजे ,राजाराम, शाहू राजे या सर्व काळात पुढे कान्होजींच्या नेतृत्वात आरमाराने कोणती दैदिप्यमान कामगिरी केली आणि त्याचे श्रेय या कादंबरीच्या नायकाचे कसे होते हे इतिहासातील दस्तावेज देत त्या त्या प्रसंगीच्या घटना उलगडत लेखिकेने कथानकाचा ओघ कायम राखला आहे.

पुणे जिल्ह्यातील चाकणसुपे जवळच्या काळोसे गावाचा एक लहानसा भाग आंगरवाडी हे संकपाळ घराण्यातील कान्होजी आंग्रेंच मुळगाव. त्यांचे वडील शहाजीराजांच्या चाकरीत होते. पुढे शिवाजीराजांनी त्यांना सरनौबत हे पद दिले. हर्णे जवळील सुवर्णदुर्गावर गोकुळाष्टमीला १६६९ला कान्होजींचा जन्म झाला. जेंव्हा औरंगजेबाची दख्खन आणि कोकण वर पकड होती असा तो कठीण काळ .जोडीला इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेन्च, डच सिद्दी .पण कान्होजींनी या प्रबळ शत्रूंवर दरारा ठेवला त्याचा हा उज्वल इतिहास.

कान्होजींच्या तीन पत्नी सहा अपत्ये ,पेशवे बाळाजी विश्वनाथांची असणारे त्यांचे मैत्रीचे नाते, ब्रह्मेंद्र स्वामींवर गुरु म्हणून असणारी अपार श्रद्धा आणि कान्होजींनी केलेले आरमाराचे सबलीकरण, शत्रूंवर केलेली मात, सारेच दस्तावेज, नोंदी ,पत्रे संदर्भ देत आणि तसतसे प्रसंग साधत कादंबरी आकारास आली आहे.

कलास्वरूप दृष्टीने कादंबरी म्हणजे ‘नवल पूर्ण कल्पित कथा’ .प्रदीर्घ आणि केवळ वास्तव नव्हे तर दीर्घ कल्पना पूर्ण , थोडे गुंतागुंतीचे, गद्य संविधानक. त्यात पार्श्वभूमी, वातावरण निर्मिती व्यक्तिचित्रण, रोमहर्षक प्रसंग अपेक्षित असतात. कान्होजींच्या संघर्षपूर्ण जीवनाने लेखिकेचे लक्ष वेधले. शिवकाळातील लोकजीवन फार पूर्वीचे नाही आणि स्मरणात जागे होते तो काळ आणि आधाराला इतिहासाचा अभ्यास. लेखिकेने ऐतिहासिक चरित्रात्मक कादंबरीला खुलवणारे इंग्रज कंपनीशी करार ,पोर्तुगीजांशी करार, सागरावरची लढाई , पेशवे आंग्रे तह, पत्र ,असे दस्तावेज अनेक ठिकाणी नेमके दिलेले आहेत. पण त्यावर आधारित नाट्यपूर्ण घटना प्रसंग अधिक रोमहर्षक वाटायला हवे होते. कुटुंब व समाजाचा कलात्मक चित्रण अधिकरंजक आणि चटकदार असायला हवं होतं. बुद्धिमान ,एकनिष्ठ अजेय कान्होजींचं भावचित्रण चित्रण लेखिकेच्या अतिशय रुजू आणि संयमी शैलीमुळे संयमीत झालेलं आहे.

पण एकंदरीत ‘सरखेल कान्होजी आंग्रे’ या अजेय योद्धाचे सरस चरित्र वाचकांना देण्यात शुभांगी गान यांना यश आलेलं आहे .यासाठी त्यांचे अभिनंदन करते .भावी काळातील लेखनासाठी त्यांना शुभेच्छा देते व माझ्या लेखणीला विराम देते.

 

‘सरखेल कान्होजी आंग्रे’, ‌‌. डाॅ. सौ प्रज्ञा आपटे

‘अजेय योद्धा ‘ ज्येष्ठ लेखिका व समीक्षक

शुभांगी गान ९९२३१५०४६५

अनघा प्रकाशन ठाणे पूर्व

पृष्ठ ३७२ मूल्य रुपये ६५०

प्रतिक्रिया व्यक्त करा