*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम लेख*
*चहा दिन…*
आज काय म्हणे चहा दिन! आमच्या कडे प्रत्येक दिवस च
चहा दिन असतो! सकाळी उठल्यापासून च चहाची आवर्तने सुरू असत! प्रथम शिळ्या दुधाचा चहा घेऊन प्रातर्विधी ची
सुरूवात! मग ताजे दूध आले की
ताज्या दुधाचा चहा! आणि कामाला सुरुवात! ९-३०/१० वाजता नाश्ता झाला की पुन्हा एकदा अर्धा कप चहा सर्वांनाच पाहिजे असे… असे सकाळचे चहा सत्र चालू असतानाच कोणी भेटायला आले किंवा पाहुणे आले की चहाची ऑर्डर असेच!
दुपारचे सत्र बरोबर तीन वाजताच्या चहाने सुरू होई! त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता कामावरून येणाऱ्यांसाठीचा चहा हा बहुदा शेवटचा चहा असे. माझ्या माहेरी चहा असे पण सासरी आल्यावर वरील प्रमाणे चहाची चक्रावर्तने चालू असत..
चहाच्या इतक्या वेळा तर चहा कसा असावा यावरही चर्चा होत असे. दाट दुधाचा चहा, जास्त चहा, साखर घालून उकळलेला असा कडक मिठी चाय असाही चहा लागत असे.माझ्या माहेरी इंग्लिश टी प्रमाणे दूध, साखर कमी चहापत्ती असलेला चहा असे. चहाची पत्ती पाणी उकळल्यावर घालून लगेच खाली उतरून झाकण ठेवले जाई. असा हा चहा पांचट, फुळकावणी चहा असे सासरी म्हटले जाई.
चहाचे विविध प्रकार तर होतेच पण त्या घेण्याच्या तऱ्हाही वेगवेगळ्या.. अर्धा कप, त्याहून कमी म्हणजे कानाखाली (कपाच्या),, किंवा एक घोट असं
नामा निधान होत असे. पण तेवढा का होईना चहा घ्यायचा.. चहाला नाही म्हणणे म्हणजे सवाष्णीने कुंकवाला नाही म्हटल्यासारखेच आहे अशी बोलायची पद्धत! त्यामुळे बाहेर
कोणी ही आले तरी चहाचे आधण चढले पाहिजेच!
त्यातून ही काही घरात सकाळी
चहा दूध न घालता गाळून ठेवला जाई.आणि थोडा थोडा काढून दूध घालून गरम केला जाई..पण
अशा चहाची चव वेगळी चव होत असे. आमच्याकडे तर चहा उकळून खाली ठेवला की तापायला ठेवलेल्या दुधावरच, गॅसवरच चहा गाळला जाई! कारण काय तर त्यामुळे चहा गार होत नाही! हे तर मी प्रथमच पाहिलेले होते.. पण एकंदरीत चहा प्रकरण आमच्या घरी खूपच असे.
केरळ मध्ये गेलो असताना चहाचे मळे बघायला मिळाले तिथे चहाच्या पानांच्या क्वालिटीनुसार वर्गीकरण केलेले असे. पानांची तोडणी ठराविक पद्धतीनेच केलेली असते. अगदी वरची नवीन पाने खुडून ती चहाची पाने वेगळी ठेवलेली असत. त्या पानांचा दर्जा हा सर्वात जास्त असे. इंग्लंडमध्ये जो चहा आपल्याकडून निर्यात होत असे तो चहा असा उच्च दर्जाच्या पानांचा असे. जसजशी जून पाने असतील ती पाने कमी प्रतीची ,कडक चहा बनवणारी असतात. असा चहा आपल्याकडे घरात बनवला जातो. अर्थातच आपल्याला कडक चहाची जास्त सवय आहे. साधारणपणे शंभर दीडशे वर्षांपूर्वी आपल्याकडे चहा पिणे निषिद्ध मानले जाई. माझ्या आठवणीत आजोळी चहा करत नसत, तेव्हा आमची आजी किंवा घरातील मोठ्या बायका गुपचूप चहा करून तो बाजूला ठेवत असत. मुलांनी चहा पिणे तर अजिबातच नव्हते.. पण नंतर नंतर चहा वरची ही बंदी हळूहळू उठली. दूध परवडत नाही म्हणून चहा प्यायला थोडीफार सुरुवात झाली. चहा ऐवजी कोको किंवा कॉफी आम्हाला मिळत असे. पण चहाची खरी चव होस्टेलला राहायला गेल्यावर कळली!
अभ्यासासाठी जागरण करायचे तर चहा पाहिजेच अशी मनाशी एक खूणगाठ होती. त्यामुळे रात्री अभ्यासाला बसायचं म्हणजे प्रथम चहा करायचा! तो चवीने पीत, गप्पा मारत अभ्यास करण्यावर चर्चा होत असे.
असं करता करता हळूहळू मी चहाबाज झाले!
घराबाहेर पडल्यावर असे लक्षात आले की चहा हे सर्वसामान्य लोकांचे आदरातिथ्य करण्याचे पेय आहे. करायला सोपे, कमी
खर्चिक आणि आणि चटकन मिळू शकण्याजोगे असे चहा हे पेय आहे. चहा नको म्हटले की दुसऱ्याच्या घरी कॉफी, दूध असे पर्याय असतीलच असे नाही आणि त्यामुळे यजमानाची अर्थातच पंचाईत होत असे.
चहा हे कॉमन पेय असल्यामुळे
सर्वांनाच सोयीचे असे असते.
कोणाच्या घरी चहा झाला नाही तर लगेचच म्हटले जाते की, ‘त्यांनी साधा चहा सुद्धा पाजला नाही!’असे हे चहा महात्म्य!
आता वेगवेगळ्या प्रकारचे चहा पेय बाजारात मिळते. मलईचा चहा,गुळाचा चहा हा ही अलिकडे फेमस झाला आहे! पुण्यामध्ये तर चहाची स्पेशल दुकाने बघायला मिळतात. डेक्कन जिमखान्यावर असेच एक चहाचे केंद्र आहे, जिथे दहा रुपयाला चहा मिळतो. तो चहा घेण्यासाठी रांग लागलेली असते!
‘महाराष्ट्र टी डेपो ‘ हे मंडई जवळ
असलेले उत्तम चहा मिळण्याचे ठिकाण, हे आम्हाला पुण्यात आल्यावर कळले. तेव्हा आमचं घर मंडई जवळ होतं. त्या रस्त्यावर लाईन लागलेली असे. सुरुवातीला आम्हाला ही लाईन कसली आहे तेच माहित नव्हतं! मग कळलं की चहा पावडर घेण्यासाठी लोक कुठून कुठून महाराष्ट्र टी डेपोमध्ये येतात आणि चहा पावडर घेतात! अर्थात प्रत्येक गावात अशी काही वैशिष्ट्यपूर्ण चहाची दुकानं ठरलेली असतात. तिथून आणलेल्या चहा शिवाय चहा प्यायला नको वाटतं असे म्हणणारे लोक असतात. चहा हे एक छोट्या प्रमाणात व्यसनच आहे त्यामुळे व्यसना संबंधी असणारे सर्व गुण चहा मध्ये पण येतात.कामगार वर्गाला तर चहाची तलफ असतेच! कोकणात तर कामाच्या बायका,गडी ह्यांना चहा द्यायचाच हा अलिखित नियम च असतो!
चहामुळे तरतरी येते. काम करायला उत्साह येतो. चहा मुळे माणसं जोडली जातात. चहा हा सर्वांचा कॉमन विषय असतो. हे सर्व जरी खरे असले तरी जास्त चहा पिणे हे प्रकृतीला कायमच वाईट आहे. चहामुळे भूक मंदावते. कडक चहामुळे उष्णता वाढते. तोंड येणं यासारख्या गोष्टी होतात. पोटाच्या तक्रारी वाढतात.
शेवटी काय कोणतीही गोष्ट ही मर्यादित असली तरच ते चांगली असते आणि ती मर्यादा गेली की ती त्रासदायक ठरते. पण चहा दिनाच्या निमित्ताने चहाबद्दल भरपूर काही आठवणी जाग्या झाल्या. यांचे एक मित्र तर सांगली ते कराड या रेल्वे प्रवासात या स्टेशन पासून त्या स्टेशन पर्यंत किमान पाच-सहा वेळा तरी चहा पीत असत!
असा हा चहा, ज्याच्यावरती पुष्कळच कथा लिहिण्याजोग्या आहेत पण सध्या तरी हे चहा पुराण इतकेच पुरे!
उज्वला सहस्रबुद्धे, पुणे

