*श्रीधर नाईकांचे विचार आत्मसात करून अपप्रवृत्तींना नष्ट करण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे – विनायक राऊत*
*विविध सामाजिक कार्यक्रमांनी श्रीधरराव नाईक यांचा ३४ वा स्मृतिदिन संपन्न*
*रक्तदान शिबिरात १०५ रक्तदात्यांनी केले रक्तदान*
सिंधुदुर्ग हा वैचारिक आणि सुसंस्कृत जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये श्रीधरराव नाईक यांच्या रूपाने एक विचारी आणि सुसंस्कृत नेतृत्व उदयास आले होते.मात्र जिल्ह्यातील विकृत दानवी प्रवृत्तीने श्रीधर नाईक यांची हत्या करून त्यांचे जीवन संपविले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता.अशा अपप्रवृत्ती आजही समाजात कायम असून त्या अपप्रवृत्तींना जिल्ह्यातून कायमस्वरूपी नष्ट करण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे. श्रीधररावांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेऊन त्याचा वारसा नाईक कुटुबिय जोपासत आहेत. श्रीधर नाईक यांचे विचार सर्वांनी पुढे नेले पाहिजेत असे प्रतिपादन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी केले.
कै. श्रीधरराव नाईक यांचा ३४ वा स्मृतिदिन आज कणकवली येथील श्रीधरराव नाईक चौक येथे साजरा करण्यात आला. प्रथमतः श्रीधरराव नाईक यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मा. खा. विनायक राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्मृतिदिन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान यावेळी रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कणकवली तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. कणकवली तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना घोंगडी व नारळ आणि सुपारीचे रोप देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त झालेले प्रा.हरिभाऊ भिसे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले श्रीधर नाईक यांनी ३४ वर्षापूर्वी समाजकारणात मोठे काम केले होते. गरीब गरजू व्यक्तींना आर्थिक सहाय्य करण्याबरोबरच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याच्या कार्यामुळे जिल्ह्यात श्रीधर नाईक यांचे नावलौकिक झाले होते. मात्र विरोधकांना ते मान्य नसल्याने त्यांची हत्या झाली. अशा हत्या करून व्यक्ती संपविता येतो परंतु परोपकारी व्यक्तीचे विचार कधीही संपत नाहीत. त्यांचे विचार अजूनही जिवंत आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वातून प्रेरणा घेऊन त्यांच्यासारखे काम करणारे कार्यकर्ते जिल्ह्यात घडले पाहिजेत हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख म्हणाले, श्रीधर नाईक यांनी राजकारणात आणि समाजकारणात आपला वेगळा ठसा उमटविला होता. गेली ३४ वर्षे सातत्याने श्रीधर नाईक यांचा स्मृतिदिन सुशांत नाईक आणि नाईक कुटुंबीय विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करीत आहेत. यातूनच श्रीधर नाईक यांचे कार्यकर्तृत्व किती मोठे होते हे सिद्ध होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर म्हणाले, समाजात राजकीय अपप्रवृत्ती पुन्हा फोफावल्या असून त्याचे समर्थन नवीन पिढी करताना दिसत आहे. या अपप्रवृत्ती नष्ट करण्यासाठी त्या विरोधात फार मोठा लढा देणे गरजेचे आहे. श्रीधर नाईक यांच्या हत्येचे दुःख केवळ नाईक कुटुंबाचे न राहता ते समाजाचे दुःख झाले पाहिजे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला मोठी लढाई लढावी लागणार आहे. जिल्हा वासियांनीही आपण कोणासोबत रहावे हे ठरवले पाहिजे आणि हा विचार ताकदीने उभा राहिला पाहिजे असे सांगीतले.
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले, श्रीधर नाईक हे समाजकारणातील मोठे वादळ होते. त्यांच्या बरोबर काम केलेल्या अनेकांकडून हे ऐकायला मिळते. त्यांच्या स्मृती चिरंतन राहिल्या पाहिजेत यासाठी त्यांचे विचार आम्ही जिल्ह्यात समर्थपणे पुढे नेत राहू.
कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत म्हणाले, सामाजिक बांधिलकी आणि समाजकारण याची सांगड घालून श्रीधर नाईक यांनी स्वतःला समाजकारणात झोकून दिले होते. ते युवकांचे प्रेरणास्थान होते. शेतकऱ्यांबद्दल त्यांना आदर होता आणि आता सुशांत नाईक यांनी त्यांचे कार्यकर्तृत्व पुढे नेत शेतकऱ्यांचा सन्मान केला.
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले, श्रीधर नाईक यांनी गोरगरीब लोकांना मदतीचा हात दिला होता. अनेकांना रोजगार मिळवून दिला.राजकारणाबरोबर सामाजकारणाचा मूलमंत्र त्यांनी समाजात रुजविला होता. समाजाला त्यांनी एक विचार दिला. त्यांचे विचार संपविण्यासाठी त्याची ३६ व्या वर्षी हत्या झाली. परंतु समाजात त्यांचे विचार कायम राहिले आहेत. सलग ३४ वर्षे त्यांचा स्मृतिदिन साजरा केला जात आहे. त्यांच्या समाजकारणाचा वारसा आम्ही सर्वजण असाच पुढे सुरू ठेवणार आहोत असे सांगितले.
यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, रत्नागिरी संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य प्रसाद रेगे, पत्रकार अशोक करंबेळकर, मुरलीधर नाईक, सतीश नाईक, संकेत नाईक, भास्कर राणे,अरुण भोगले, बाळा भिसे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत, हरिभाऊ भिसे,प्रसाद अंधारी, राजू शेटये, राजू राठोड, सचिन सावंत, उत्तम लोके,धीरज मेस्त्री, रुपेश आमडोसकर, सचिन आचरेकर, दिव्या साळगावकर, संदीप कदम, प्रवीण वरुणकर,भिवा परब, अण्णा महाडिक,महेश कोदे, नितीन राऊळ, लक्ष्मण हन्निकोड,अरुण परब, उत्तम सुद्रिक, रवी भंडारे, पार्थ नाईक आदींसह श्रीधर नाईक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केले.
