You are currently viewing माझा चित्रकलेचा तास…

माझा चित्रकलेचा तास…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*माझा चित्रकलेचा तास…*

 

हा विषय पाहिल्या बरोबर

माझ्या चेहऱ्यावर एकदम हसूच फुटले व मी

चक्क आमच्या कापडण्याच्या ८ वीच्या क्लास

मध्येच मी मला दिसले. हो, कारणही तसेच आहे हो! जसे आम्ही म्हणजे अस्मादिक कथेत “ढ”

तसेच चित्रकलेत प्रचंड “ढ”!

 

आमचे चित्रकलेचे वाणी सर मात्र खूप छान

होते. बुटकेसे, मिशावाले, गोल चेहऱ्याचे, पिवळसर वर्णाच्या बोक्यासारखे दिसणारे.

अतिशय शांत. त्यांचा आवाज चढलेला वा

त्यांना रागावतांना आम्ही कधीही पाहिले नाही.

 

सर आवडायचे हो, पण चित्रकलेचा तास म्हटले की माझी” पाचावर धारणच बसायची. अहो, ढ

म्हणजे किती ढ? साधा पिवळा वॅाश सुद्धा

कागदाला नीट देता यायचा नाही. आणि रंगांचे मिश्रण? अबबबबबबब! काळ्यात पिवळा,

पिवळ्यात निळा, निळ्यांत ब्राऊन? रंग कोणते बनतात? राम राम राम.. काहीच येत नव्हते हो!

इतकं का ढ असावं माणसाने एखाद्या विषयात.

आता ही वैषम्य वाटतं हो.

 

जाऊ द्या. मजा यायची पण तासाला. तुम्ही म्हणाल का? आमचे सर रांगांमधून राऊंड घेत

आताही मला दिसताहेत. मी बसायची पहिल्याच

बेंचवर. नेमके सर तिथे थांबायचे, नि हातात पेन्सिल घेऊन माझ्याच कागदावर,( त्या दिवशी

मांजर काढायचे होते, बाप रे!) लगेच मान तिरपी करत मांजराचं तोंड काढायला सुरूवात करायचे.

बघता बघता काही रेघांच्या फटकाऱ्यात मांजर दिसू लागे व मी हसू लागे. माझे अर्धे काम सरच

करून टाकत. आमची स्वारी खूष.

सर मग हळू हळू बघत बघत प्रत्येक बेंचकडे

जात असत. काहींना माझ्यासारखाच थोडाफार

लाभ मिळे. मग काय? सरांचा राऊंड येई पर्यंत

कुणाचे तरी बघून तंगड्या काढायच्या. त्या कशा

असतील तुम्हीच कल्पना करा नि हंसा मनसोक्त.

 

एखाद्या दिवशी फ्रि हॅंण्ड असे. आमचा हात तर

नेहमीच फ्री असे. मग मी सर बेंच जवळ कधी

येतील याची वाट बघे. कागदाची घडी करून

दोन भाग करून रेषा फक्त मला येत असे.

तेवढ्यात सर माझा कागद ओढून घेत फटाफट

अर्ध्या भागात मस्त महिरपीचं डिझाईन काढत.

त्या कमानदार रेषा पाहून आणखीच जीव घाबरा

होई. सरांनी अर्धे डिझाईन काढले पण डावी कडचे विरूद्ध डिझाईन मी कसे काढू रे देवा आता! नेमका अशावेळी देव माझ्या मदतीला

धावून येत तासाचे टोल पडत की, सर वर्गाबाहेर.

सुटले रे बाबा आज! उद्याचे उद्या बघू म्हणत कागदाची घडी दप्तरात जाई.

 

आता ही लिहितांना जीव धडधडतोय हो! तुम्हाला

काय माहित. वर्गात बसलेय् ना मी? मग एखाद्या

दिवशी कागदाला पिवळा वॅाश देऊन कंपासला पेन्सील लावून सर गोल गोल काढत व त्यात रंग भरायला

सांगत.माहित नाही काय बोंब पाडली असेल आम्ही! तो इतरांचा व सरांनी रंगवलेले गोल मात्र फार सुंदर दिसत ते आताही मी बघते आहे.

 

बरेच सर विस्मृतीत गेले पण वाणी सर इतके

गोड असून विषयाच्या दहशतीने ते मेंदूतून आज ही गेले नाहीत. कुठे असतील बिचारे! असतील की? खूप गरीब होते स्वभावाने सर. अनमॅरीड

होते. तेव्हा कळत नव्हते पण नंतर कळले की

आमच्या घरासमोर ते नेहमी येत कारण तिथल्या

दोन मुली त्यांच्या प्रेमात पडल्याची कुजबुज

आता आठवते. तेव्हा ही अक्कलच नव्हती ना!

त्या मुलींबरोबर सरांनी फोटो ही काढले होते.

असो. तरूण वयाचा दोष. आपल्याला काय करायचे आहे?

 

वार्षिकला काय बोंब पाडली असेल आठवत

नाही. नापास झाल्याचे मात्र आठवत नाही.

दहावी नंतर मी धुळ्यालाच शिकायला गेले. वाणी

सरांसह सर्वच मागे पडले.

 

माझ्या मुलांचे कुत्र्यामांजरांचे होमवर्क घरी आमच्या पर्यंत आल्यावर मात्र मला वाणी सरांची

प्रचंड आठवण आली. सर, तुम्ही तेव्हा मला मांजर काढून दिली नसती तर तर…

आज माझ्या मुलाच्या मांजरी ऐवजी मी कुत्रे

का काढले असते. सर, तुम्ही मला मांजर काढून

देऊन प्रचंड अन्याय केला हो. मुलाला मांजरी

ऐवजी कुत्रे काढून दिल्यामुळे बाकी सर्व विषयात पहिला असून केवळ ड्रॅाईंग मुळे तो सतत दुसरा राहिला हो.. वाणी सर.. तुम्ही मला

मांजर काढून देऊन माझ्या मुलांचे नुकसान केले

हे कसे सांगू मी तुम्हाला..

 

जाऊ द्या वाणी सर..

अहो, दहावीला ते दोघे शाळेत पहिले आहेत.

वाटल्यास बोर्डावर नाव पहायला या.

थॅंक्यू वाणी सर…

 

प्रा.सौ.सुमती पवार

प्रतिक्रिया व्यक्त करा