You are currently viewing जागतिक योग दिवस

जागतिक योग दिवस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अमिता जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*जागतिक योग दिवस*

***********************

 

आज “जागतिक योग दिवस ” एक स्तुत्य उपक्रम.

“योग ” भारताची हजारो वर्षांपासूनची परंपरा.काळाच्या ओघात याचे महत्त्व आपणच विसरलो होतो विदेशी व्यायाम प्रकाराच्या मागे लागलो.जेव्हा जगाला याचे महत्त्व पटले व त्यांनी ते अंगिकारले तेव्हा परत आपण त्याकडे वळलो.

पूर्वी ऋषीमुनी खडतर तपश्चर्या करत व आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कठीण शारीरिक मुद्रांचा वापर करत तसेच दैनंदिनी मध्येही ते सूर्य नमस्कार,प्राणायामाचे विविध प्रकार,अशा गोष्टी शरीर निरोगी रराहाण्यासाठी व ध्यान धारणेपूर्वी चित्त एकाग्र करण्यासाठी करत.

त्यातील काही नंतर व्यायामाची आसने म्हणून प्रचलित झाली.जी आपण आपल्या नित्याच्या जीवनशैलीत सामावून घेतली तर निरोगी राहता येते.

फक्त एक गोष्ट खटकते की आज अनेक योग गुरु शेकडो अथवा हजारोंच्या संख्येने एकत्रितपणे ही योगासन करवून घेतात किंवा लोकही टी व्ही वर असे कार्यक्रम चालू असताना त्या प्रमाणे आसन करतात.

खरं तर कोणताही व्यायाम हा व्यक्ती सापेक्ष आहे.प्रत्येकाची जीवनशैली,शारीरिक कष्टाचे प्रमाण ,शारीरिक क्षमता,आपण राहतो त्या वातावरण प्रमाणे आपला आहार,विहार या सर्व गोष्टींचा विचार करून व्यायाम केला पाहिजे.पण याच महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष केले जाते.

दुसरी महत्वपूर्ण गोष्ट अशी की या सर्वाला “योग ” अथवा ” योगाभ्यास ” म्हणणे चुकीचे आहे. “योग ” ही खूप उच्च कोटीची ,उच्च स्तराची साधना आहे.भौतिक सुख सोडून ,त्यापासून खूप दूर जाऊन परमार्थाकडे नेणारी साधना आहे.तेव्हा आपण जी योगासन करतो त्याला “योग ” म्हणून त्या परमोच्च साधनेची अवहेलना करू नये.

जरूर विचार करा.योगासन योग्य गुरूकडून शिका.ती पण वैयक्तिक. अंधानुकरण करू नका ही विनंती.

 

नित्य करिता योगासने

शरीर राहील निरोगी

वाढेल सकारात्मकता

जीवन होईल आनंदी ||

प्रतिक्रिया व्यक्त करा