*महाराष्ट्र शासनकडून अत्यावश्यक संच सुधारित योजनेस मान्यता*
*श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती*
कुडाळ :
इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य व सुरक्षा आणि कल्याणासाठी शासनाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. याशिवाय नव्याने नोंदणीत झालेल्या कामगारांना सुरक्षा संच वितरणास देखील कामगार विभागाने मान्यता दिली असून लवकरच वितरणा संदर्भात पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष श्री प्राजक्त चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिली.
शासनाकडून कामगारांसाठी यापूर्वी गृहपयोगी वस्तुसंच व सुरक्षा संच योजनेचा लाभ कामगारांना देण्यात आलेला असून आता महायुती सरकारने पात्र नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच (Essencial kit) वितरण योजनेस मान्यता दिली आहे. या अत्यावश्यक संचामध्ये पत्र्याची पेटी, प्लास्टिकची चटई, धान्य साठवण कोठी, धान्य साठवण कोठी, बेडशीट, चादर, ब्लॅंकेट, साखर ठेवण्यासाठीचा डबा, चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा, वॉटर प्युरिफायर या वस्तूंचा समावेश असून लवकरच या संदर्भातील शासन स्तरावर निविदा प्रक्रिया कार्यवाही राबवून कामगार बांधवांना लाभ देण्याचे धोरण शासनाकडून आखण्यात आले आहे. प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी प्रमाणित केलेल्या पात्र यादीनुसारच वितरण केले जाणार आहे. गोरगरीब कामगारांच्या मूलभूत गरजा यांचा विचार करून कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.

