*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा फणसळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भक्तांची भेट*
विठू देवळात उभा भक्ताविण एकाकी पडला.
वर्ष झाले भेटून ,जीव त्याचा व्याकुळला.
वारकऱ्यांच्या आठवाने अंगोपांगी मोहरला
आहे आज एकादशी भक्ता भेटण्या आतुरला.
इंद्रायणी,भीमा,भामा,देती वाऱ्याला सांगावा,
देहू,आळंदीच्या वेशीतून पालख्या निघाल्या
त्यांनी घेतला निरोप जाण्या पुढच्या गावा.
स्वागताला भक्तांनी रांगोळ्या घातल्या
ज्ञानोबा,तुकोबा,यांच्या पुण्याईचे फळ,
भक्तांनी व्यापले भूमंडळ,रिकामे राऊळ,
पांडुरंगा भेटावया झाले वारकरी उतावीळ.
पृथ्वीवर मृदगंध पसरण्या पावसाची गळ
राव, रंक, जाती,धर्म पल्याड हे वैष्णव
ना गर्व, ना हेवा,असा सात्विक स्वभाव,
विठुनामाने पापे सरती,पैलतीरी लागे नाव ,
असा मनी द्दढभाव, त्याचे वारकरी नाव.
वारकऱ्यांची मांदियाळी वीणा,मृदुंग सांगाती
ढोल टाळांचे आवाज ,हाती पताका दिसती,
तुळशी वृंदावन डोई,नामस्मरणात दंग होती
ग्यानबा तुकाचा गजर,वाट पाऊले चालती
वारीने माणुस माणसाला जोडी
भगवंताचरणी अहंभाव सोडी
लागते नामस्मरणाची गोडी
संताची शिकवणअमलात आणा थोडी
वाळवंटी विठूगजरात भक्त झाले दंग,
साथ देती,भजनाला एकतारी,वीणेसंग.
रवी, सौदामिनी आणि वर्षा बघून झाले दंग सावळ्या ढगात मिसळले इंद्रधनुचे रंग.
कपाळी बुक्का,गळा तुळशीमाळा
आढळनिष्ठा असा भक्त जगावेगळा
नामा, पुंडलिकाने जोडीले सकळा
दुमुदुमुली पंढरी,पांडुरंग लेकुरवाळा
चंद्रभागेच्या स्नानाने शुचिर्भूत झाला सावळा
भेटीचा क्षण आगळा मनी प्रेमाचा जिव्हाळा,
गळा वैजयंती माळा,नेसून पितांबर पिवळा,
आलेआले वारकरी , विठू स्वागता ठाकला.
*प्रतिभा फणसळकर ,पुणे*

