अमरावती :
आज दिनांक 18 जून रोजी आमचे विद्यार्थी मित्र व अमरावती मधील मोर्शी रोडवरील अर्जुन नगरचे सुपुत्र श्री स्वप्निल गोपाळराव वानखडे हे आज मध्य प्रदेश मधील दतीया येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले आहेत. आमच्या अमरावतीचा मुलगा आमच्या परिवारातील मुलगा जिल्हाधिकारी झाला हे खरोखरच आमच्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे.
स्वप्निलचे वडील गोपाळराव वानखडे हे व मी दोघे मित्र. आमचा परिचय झाला तो सुप्रसिद्ध कवी डॉक्टर बबन सराडकर यांच्यामुळे. श्री बबन सराडकर हे करजगावचे व श्री गोपाळराव वानखडे हे देखील त्याच परिसरात राहणारे. आम्ही महाविद्यालयात शिकत असताना हा परिचय झाला आणि अद्यापही तो कायम आहे.
स्वप्निल हा जवाहर नवोदय विद्यालय अमरावतीचा विद्यार्थी. या विद्यालयामध्ये त्याचे योग्य संगोपन झाले. त्याच्यावर झालेल्या सुसंस्कारामुळे तो उत्तरोत्तर प्रगती करीत गेला. आज या जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्री गवई आहेत. त्यांना भेटले की ते स्वप्निलची गौरवगाथा तुम्हाला सांगतील. वडील अध्यापक आई अमरावतीच्या शासकीय दवाखान्यामध्ये सेवेमध्ये. अनेक वेळा स्वप्निल ला शाळेमध्ये पायी जावे लागले. पण पायी जात असताना देखील त्यांचे वडील श्री गोपाळराव यांनी स्वप्निलला कलेक्टर होण्याचे स्वप्न दाखवले आणि त्यासाठी त्यांनी अमरावती शहरांमध्ये खूप चांगल्या शाळा असताना देखील शासकीय जवाहर नवोदय विद्यालयामध्ये त्याला टाकले.
खरं म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय मध्ये गेलेला विद्यार्थी याचा सर्वांगीण विकास होतो. तो कोणत्याही क्षेत्रात गेला तर त्याचा विकासच होत राहतो. जवाहर नवोदय विद्यालय नियमित तालीम घेतली जाते. शिवाय शाळा निवासी असल्यामुळे सकाळी चार पासून रात्री दहापर्यंतच वेळापत्रक ठरलेलं असते. शिवाय त्याचं तांतोतंत पालनही होते.
या सर्व गोष्टींचा स्वप्निल वर खूप परिणाम झाला. सुसंस्कार तर झालेच .पण आयएएसला लागणारा जो पूर्व अभ्यास पाहिजे तो म्हणजे सहावी ते बारावी पर्यंतचे अभ्यासक्रम. या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये एनसीईआरटी हा अभ्यासक्रम असल्यामुळे स्वप्नांची पूर्व परीक्षेची तयारीही तो जवाहर नवोदय विद्यालयात असतानाच झाला. स्वप्निलचे व्यक्तिमत्व देखणे आहे .गोरेपान आहे आणि कष्टाळू आहे .
स्वप्निल जेव्हा कलेक्टरच्या परीक्षेला पहिल्यांदा बसला तेव्हा तो जेव्हा पास झाला. योगायोगाने त्याचे अभिनंदन करणारा मी पहिला इसम होतो. जसा कलेक्टरच्या परीक्षेचा निकाल लागला तसा मी अमरावतीच्या आयएएस सेंटरवर फोन केला. योगायोगाने स्वप्निल तिथे आलेला होता. तिथले अधिकारी श्री मानकर यांना मी विचारले की आपल्या अमरावती केंद्रातून काही मुले कलेक्टरची परीक्षा पास झालेले आहेत काय. त्यांनी मला चार मुलांची नावे सांगितली आणि मानकर मला म्हणाले सर योगायोगाने स्वप्निल वानखडे सर इथेच आहेत .असे म्हणून त्यांनी स्वप्निलला फोन दिला. स्वप्निलला छान वाटले. मी दुसऱ्या प्रदेशात होतो पण तेथून काठोळे काकांनी आपल्याला फोन केला. तो फोन त्याचा उत्साह वाढवून गेला .
स्वप्निल आता जिल्हाधिकारी झाला आहे. पण या अगोदर तो आय आर एस तत्पूर्वी असिस्टंट कमांडर सीआरपीएफ ला देखील सिलेक्ट झाला होता. त्याही ठिकाणी देखील त्याने आपली सेवा दिली आहे. तिथे सेवा करीत असताना त्याने आय ए एस चा अभ्यास सुरू ठेवला. आपले कर्तव्य बजावत असताना तो सोबत आय ए एस चा अभ्यास करीत होता. जवाहर नवोदय विद्यालयाची सुदृढ पार्श्वभूमी असल्यामुळे स्वप्निलला नोकरी आणि अभ्यास हे समीकरण सांभाळता आले आणि तो असिस्टंट कमांडर आय आर एस आणि आता आयएएस झाला
स्वप्निलला मध्यप्रदेश कॅडर मिळाला. सर्वप्रथम त्याची नेमणूक मध्यप्रदेशात हुशंगाबादला झाली. त्यानंतर थंड हवेचे ठिकाण पचमढी येथे त्याची नेमणूक झाली. तो व त्याचे वडील मला प्रत्येक वेळेस म्हणायचे काका तुम्ही आमच्याकडे या. पण तो योग आला रेवा आणि जबलपूर येथे. रिवा येथे स्वप्निल जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी होता. योगायोगाने जबलपूरला माझे व्याख्यान होते. मी माझे व्याख्यान आटोपल्यानंतर माझे मित्र श्री रामकुमार पटेल व श्री अनिल सिंगोर यांना सोबत घेतले व रिवा गाठले. स्वप्निलची मुख्यमंत्र्यांबरोबर मीटिंग होती. ऑनलाइन होती. तरीपण स्वप्निलने आम्हाला भरपूर वेळ दिला .आमचे मनापासून स्वागत केले केले. श्री रामकुमार पटेल आणि श्री अनिल सिंगोर यांना देखील नवल वाटले. मुख्यमंत्र्यांची मीटिंग असताना त्यांनी दिलेला वेळ त्यांच्या लक्षात राहिला .
पुढे स्वप्निल जबलपूरला महानगरपालिकेला आयुक्त म्हणून आला. रामकुमार पटेल यांचा मला फोन आला. ते आमच्या मिशन आय ए एस चे कार्यकर्ते. ते म्हणाले काठोळे सर स्वप्निल सर इथे आयुक्त म्हणून आलेले आहेत. मी स्वप्निलला फोन केला .तो म्हणाला काका आता मी जवळ आलेलो आहे .तुम्ही भेटायला यायला हरकत नाही.
मी जबलपूरला गेलो .जबलपूर म्हणजे आमच्या मिशन आय ए एस.च्या कार्यकर्त्यांचे गाव. एक एक करता करता वीस कार्यकर्ते जुळले. मी स्वप्निलला सांगितले की आम्ही वीस जण तुला भेटायला येणार आहोत. स्वप्निल म्हणाले काका आपण सर्वजण या. आपले सर्वांचे स्वागतच आहे. तेवढ्यात पाऊस सुरू झाला. आमच्या सर्व कार आयुक्त बंगल्याकडे चालू लागल्या. आम्ही आयुक्त बंगल्यात पोहोचलो तर पाऊस सुरूच होता. एक छत्री आमच्या कारजवळ आली. मी काच खाली केली .स्वप्निल वानखडे सर आम्हाला घ्यायला स्वतः छत्री घेऊन आले होते .
स्वप्निल ने आमचे जबलपूरला जे स्वागत केले ते जबलपूरचे आमचे मित्र विसरणार नाहीत. स्वप्निल व स्वप्नीलच्या पत्नीने अतिशय मनापासून गरमागरम पोटभर पकोडे आम्हाला खाऊ घातले. वातावरण पकोडे खाण्यासारखेच होते. अल्पोपहाराबरोबरच सामाजिक कार्यावर चर्चाही झाली आणि स्वप्निल म्हणाला काका मी या जबलपूरला असेपर्यंत आपण चांगले कार्यक्रम घेऊ. मी स्वतः कार्यक्रमाला येतो. त्याप्रमाणे आम्ही लागोपाठ जबलपूरला वेगवेगळ्या भागात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतल्या .
आमचे दरवर्षी स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिरे होतात. त्या शिबिराला न चुकता स्वप्निल सुट्टी काढून येतो. मध्यंतरी अमरावतीचे जिल्हाधिकारी श्री किरण गीते यांनी आम्हाला दर महिन्याला कार्यक्रम स्पर्धा परीक्षेचा घेण्याची विनंती केली .त्यासाठी आवश्यक असलेला निधी देखील त्यांनी जिल्हा नियोजन समितीतून आम्हाला उपलब्ध करून दिला. आमच्या महा नगरपालिकेचे उपायुक्त श्री नरेंद्र वानखडे यांनी या कामी पुढाकार घेतला. दर महिन्याला अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर ह्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या असलेल्या सभागृहात आमच्या कार्यशाळा व्हायला लागल्या .या कार्यशाळेला देखील स्वप्नीलने हजेरी लावली आणि उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्वप्निलचे वडील श्री गोपाळराव वानखडे हे देखील समाजाभिमुख सामाजिक बांधिलकीचे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा मला एक छंद खूप चांगला आठवतो. सकाळी पाच वाजता ते न चुकता सायकलने फिरायला जातात. कधी कधी पहाटे आमच्या घरी पण येतात. त्यांनी फिरायला येणाऱ्या मित्रांचा एक मॉर्निंग क्लब तयार केलेला आहे. या मॉर्निंग क्लबमध्ये कुणाचे वाढदिवस कुणाचे लग्नाचे वाढदिवस नियमितपणे साजरे होतात. वडीलाची ही सामाजिक बांधिलकी स्वप्निलमध्ये तंतोतंत उतरली आहे. स्वप्निल आज जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाला असला तरी तो सर्व सामान्य माणसासाठी काम करणारा त्याचे सुखदुःख जाणून घेणारा आणि त्याच्या सुखदुःखावर उपाययोजना करणारा अधिकारी झाला आहे.
हुशंगाबाद असो पचमढी असो रीवा असो ही जबलपूर असो जिथे जिथे स्वप्निलने काम केले तिथे मध्य प्रदेश सरकारने त्याचा गौरव केला आहे. त्याने केलेल्या उत्तम कामगिरीची मध्यप्रदेश शासनाने दखल घेऊन त्याचा सन्मान केला आहे. आमचा हा अमरावतीचा सुपुत्र आज मध्य प्रदेश मध्ये दतिया येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाला. ही तुमच्या आमच्यासाठी आनंदाची बाब आहे .आपण याप्रसंगी स्वप्नीलला चांगले काम करण्यासाठी मनापासून शुभेच्छा देऊ या.
प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
9890967003

