*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी वि ग सातपुते यांच्या काव्याचे लेखक विनय पारखी यांनी केलेले अप्रतिम रसग्रहण*
*ध्यासभास*
अव्यक्त ही प्रीती तुझी
किनारेच जणु समांतर
सरिता जरी वळणांची
मीच डुंबतो इथे निरंतर….
ओढ तुझीच अनामिक
तुजविण नाही गत्यंतर
मन हे तुझ्यात गुंतलेले
तू जीवा लावली हुरहूर….
तव ध्यासभास त्रिखंडी
येतो उरी भावनांना पूर
प्रवाहात मनफूल माझे
वाहते भावगंगेत चिरंतर….
तरंगते निष्पाप निर्माल्य
हा शुचितेचा साक्षात्कार
हाच अर्थ नां ! जीवनाचा
याहून जिणे कुठले सुंदर
©️ वि.ग. सातपुते.(भावकवी)
या कवितेत विगसांनी अव्यक्त ईश्वर हे अंतिम सत्य आहे आणि व्यक्त ईश्वर हा त्या अंतिम सत्याचे स्वरूप आहे हे सत्य अधोरेखित केले आहे. कवितेचे शिर्षकच मुळी ‘ध्यासभास’ असे त्यांनी ठेवले आहे. ‘ध्यासभास’ म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो त्यावेळी ती गोष्ट आपल्याला सतत आहे असे भासायला लागते. असेच असते परमेश्वराचे अस्तित्व. एकदा का त्याचा ध्यास लागला की मग आपल्याला संपूर्ण चराचरांत त्याचा भास होऊ लागतो. आपण मूर्ती पूजक आहोत. देखल्या देवाला आपण दंडवत घालतो. पण जो चराचरांत व्यापून उरला आहे आणि ज्याचा अंश आपल्यातसुद्धा आहे त्या परमपित्याला म्हणजेच अव्यक्त असलेल्या ईश्वराला आपण विसरतो. अव्यक्त किंवा व्यक्त, सगुण किंवा निर्गुण, मूर्त किंवा अमूर्त, साकार किंवा निराकार कुठल्याही अस्तित्वात तो जरी असला तरी त्याचा घ्यास घेतल्याशिवाय त्याची आपल्यावर असलेली प्रीती आपल्याला कळत नाही.
जीवन ही एक नय्या आहे. ती वळणावळणाची नदी आहे. जन्म आणि मृत्यू हे त्याचे दोन किनारे आहेत. या वळणावळणाच्या नदीत ईश्वराचं निरंतर वास्तव्य असतं. आपल्याला ही वळणावळणाची नदी तारून जाण्यासाठी त्या ईश्वराचं असणं आवश्यक असतं. तोच आपल्याला ही नदी पार करायला मदत करतो. या जीवन वळणाच्या नदीत मोह, माया, षड्विकार, ईर्षा असे अनेक अडथळे येतात. त्यांना पार करून जाणं फक्त त्याच्यामुळेच शक्य होतं.
हे आपण उदाहरणाने समजून घेऊ या.
ज्यावेळी एखाद्या उंच पर्वत शिखरावर आपला जन्म होतो आणि आपण त्या डोंगरावरून खाली एखाद्या ओढ्याप्रमाणे खळखळत उतरू लागतो. कारण त्यावेळी आपण लहान असतो. तारुण्याची ऊर्जा अंगी असते. आपले कर्म आपल्याला खाली ढकलत असते. उंच कड्यावरून खाली उतरताना आपण तेथील रंगीबेरंगी दगड, सूगंधीत फुले, सुमधुर आवाजाचे पक्षी, घनगर्द झाडी अशा अनेक सौन्दर्याने मोहित होतो. कधी त्यांच्या बरोबर खेळत, बागडत आपण मोठे होत असतो. या साऱ्या अनुभवाचा शोध घेत त्याची प्रचिती घेत आपण घडत असतो. मग आपण अनुभव, शिक्षण घेऊन मोठे होतो. आता आपण ओढा राहत नाही. लांबचा प्रवास करायला लागतो. आता आपण अडथळे पार करण्याचं कसब शिकत पुढे जात असतो. एका पर्वतावरून दुसरा पर्वत असे मार्गक्रमण करत असतो. मग त्या मिळालेल्या अनुभवातून आपण इतरांनाही द्यायला शिकतो आणि आपले नदीत रूपांतर होते. कधी कधी अंहकार, स्वाभिमान, मत्सर यांनी फुगून आपण दुथडी भरून गर्वाने वाहू लागतो. कधी वाकड्या वाटेने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तर कधी मध्येच अडखळतो. त्यावेळी आपण हे मात्र विसरतो की सगळ्या नद्यांचे गंतव्यस्थान हे महासागराकडेच असते आणि एकदा का आपण महासागराला मिळालो की आपण आपली ओळख विसून जातो. हेच खरं जीवाचे अंतिम सत्य आहे. जन्म-मृत्यू आणि परत जन्म. कारण आत्मा अमर आहे हे स्वयं भगवान असणाऱ्या कृष्णाने आपल्याला सांगितले आहे.
असे आपण मोठे होत असताना, आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय गाठत असताना आपल्याला त्या परमात्म्याला भेटायची ओढ लागते. आपलं मन त्याच्यात गुंतायला लागतं. या जीवन नदीच्या प्रवाहात त्याच्या शिवाय दुसरा तारणहार नाही हे आपल्याला समजून चुकतं. ज्यावेळी नदी म्हणजेच आपण महासागराला मिळतो त्यावेळी ती नदी महासागराला अव्यक्त ईश्वर मानते आणि त्याच्या लाटा त्याचा प्रवाह, त्याच्याशी झालेलं आपलं एकरूपपण म्हणजे व्यक्त ईश्वराच असलेलं अस्तित्व असे मानतो.
इथे अत्यंत सुंदर असा ‘ध्यासभास’ हा शब्दप्रयोग कवीने केला आहे. एकदा का त्या अव्यक्त ईश्वराचा ध्यास लागला की तिन्ही लोकांत म्हणजेच स्वर्ग, पातळ आणि पृथ्वी याठिकाणी सर्वत्रच त्याचे अस्तित्व असल्याचे जाणवू लागते. मग जो ईश्वर त्या जीवन नदीच्या प्रवाहात निरंतर आपल्या सोबत होता तोच आपल्या मनांत सुद्धा असल्याचे जाणवू लागते. आपल्या भावनांना पूर येतो, आपल्या भावगंगेत तो निरंतर वास्तव्य करून आहे याची जाणीव होते आणि त्या प्रवाहात आपण मनापासून त्याला भजू लागतो. तो भक्तीचा, भावाचा भुकेला आहे हे आपल्या लक्षात येतं.
या भवसागरात देवाच्या पायावर वाहिलेल्या एखाद्या निष्पाप फुला सारखे आपण अलगद तरंगत पुढे जात राहतो. साध्या निर्माल्यालाही पावित्रतेचा वास असतो. फुले घेताना ती माझी असतात पण एकदा का त्याला वाहिली की ती त्याची होऊन जातात. हा जो देण्याचा समर्पणाचा भाव असतो ना तोच त्याला हवा असतो. इथे मोहाचा, गुंतून राहण्याचा प्रश्न नसतो. जीर्ण झालेलं जून झालेलं निर्माल्य बनून जातं म्हणून आनंद पेरत जावा आणि जीवन जगावं त्यातून आत्मानंदाचं सुख, समाधान मिळतं हा संदेश सरांनी यातून दिला आहे.
श्रेष्ठ कवीचं मोठेपण हेच असतं. अवघ्या कमी शब्दांत ते अत्यंत गहन असा असणारा विषय आपल्या समोर सोप्या पद्धतीने मांडतात. सरांनी सुद्धा पहिल्या कडव्यात अवघ्या चौदा शब्दांत जीवनाचे अंतिम सत्य काय आहे हे उलगडून सांगितले आहे.
© *विनय पारखी* (अंधेरी, मुंबई)
