*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित व्यक्तीविशेष लेख*
काशीबाई..
पेशवेकालीन इतिहासात, काशीबाई हे एक समर्थ करारी , विचारी ,निष्ठावान स्त्री व्यक्तिमत्व होते. महादेव कृष्ण जोशी आणि शिव बाई यांची ती कन्या. महादेव कृष्ण जोशी हे सावकार होते . आणि त्यांनी पेशवाई पदाच्या कामी बाळाजी विश्वनाथ यांना मोलाचे सहकार्य केल्यामुळे, त्यांनी महादजी पंतांची कन्या काशीबाई हिला आपली सून करून घेतले. माहेरी काशीबाईला लाडू बाई असे संबोधत.
चौथे बाजीराव पेशवे यांची ती प्रथम पत्नी. बालाजी बाजीराव,(नानासाहेब पेशवे), रामचंद्र राव, रघुनाथराव, आणि जनार्धन राव हे या दाम्पत्याचे चार पुत्र. काशीबाई, रूपवान आणि मृदुभाषी होती. कर्तव्यपरायण होती.
इतिहासात बाजीराव हे अत्यंत शूर पेशवा म्हणून गणले गेले असले तरी एक रंगेल व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांची ख्याती होती. मस्तानी नावाच्या मुस्लिम नृत्यांगनेशी असलेले, त्यांचे प्रेम संबंध हेच इतिहासात जास्त गाजले. वास्तविक बाजीराव पेशवे यांचे काशिबाईंवर नितांत प्रेम होते. भरवसा होता. मस्तानी हे त्यांचं भावविश्व असलं तरी काशी बाईंचे स्थान त्यांच्या आयुष्यात तितकंच आणि नेहमीच उंचावर होतं.
मस्तानी नावाच्या वादळाने काशीबाई वर मोठा आघात झाला होता. पण शांतपणे स्वतःला सावरुन मन मोठं करून त्यांनी वास्तव स्वीकारले होते.
” आम्ही खूष आहोत.. जसे तुम्ही आम्हाला ठेविले” असे एका पत्रात त्यांनी बाजीराव पेशव्यांना लिहिले होते. एक स्त्री म्हणून काशीबाईला डावलल्याचं, दुय्यम स्थानावर गेल्याचं दुःख होतं का? की तो काळ, एक पत्नी तत्वाचा नसल्यामुळे त्यावेळच्या स्त्रियांमध्ये पतीच्या अशा अंगवस्त्रां बद्दल एक प्रकारची स्वीकृती असलेली मानसिकता त्या स्त्रियांमध्ये होती असे म्हणावे लागेल. पण काशीबाईने सदैव पतिपरायण राहून, पत्नी धर्म काटेकोरपणे पाळला. बाजीराव मस्तानी च्या प्रेम कहाणीचाही ती एक भाग बनली. एक स्त्री म्हणून तिने मस्तानीचा ही सन्मान ठेवला. मनात कधी वैरभाव अथवा द्वेषभावना बळावू दिली नाही. कर्मठ ब्राह्मण असलेल्या पेशवाईत एका मुस्लिम स्त्रीचा, कट्टर अस्वीकार मात्र ती थोपवू शकली नाही.
बाजीराव पेशवे मृत्युशय्येवर असताना, तिला तिचे पुत्र नानासाहेब पेशवे यांनी पाचारण केले आणि तिने अत्यंत प्रेमाने, धार्मिक भावनेने ,कर्तव्यपरायणतेने पतीची सेवा केली. त्याच काळात मस्तानी ही नजर कैदेत होती. बाजीराव- मस्तानीची अखेरची भेट व्हावी असे काशीबाईला मनापासून वाटत होते. पण तसे घडले नाही बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर काही दिवसातच मस्तानीचा ही मृत्यू झाला. त्यानंतर काशीबाईने त्यांचा पुत्र समशेर बहादूर याचे संगोपन केले.स्वत:च्या मुलाप्रमाणे त्याला वाढवले.शिक्षण आणि रण विद्येत पारंगत केले. पुढे पानिपतच्या लढाईत याच समशेर बहादुर ने पराक्रमाची शर्थ केली होती.
काशीबाईच्या मनाची ही महानता इतिहासात कोरली गेली.
बाजीरावाच्या मृत्यूनंतर काशीबाईने खूप तीर्थाटन केले.
ती धार्मिक वृत्तीची होती. नर्मदेच्या वाळवंटी त्यांनी एक मोठे शिवमंदिर उभारले जे आजही रामेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
नाजूक प्रकृती, सततची गुडघेदुखी, संधिवात हे आयुष्यभर सोबतीला होतेच. पुण्यात जन्मलेल्या या धीरगंभीर स्त्रीचे निधन नैसर्गिक रित्या साताऱ्याच्या भूमीवर झाले.
काशीबाई बाजीराव पेशवे…. एक आगळे वेगळे, मोठ्या मनाचे ,धीरगंभीर मृदुभाषी, शांत, कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणून इतिहासात सन्माननीय आहे!!!
राधिका भांडारकर
