You are currently viewing निपाणी मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधन

निपाणी मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधन

निपाणी:

निपाणी मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार,मतदार संघाच्या हरित क्रांतीचे शिल्पकार व पहिले हॅट्रिकवीर आमदार काकासाहेब पांडुरंग पाटील (वय ७१) रा.वाळकी (ता. चिकोडी) यांचे मंगळवार दि.१७ रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनामुळे निपाणी तालुक्यावर शोककळा पसरली असून कार्यकर्त्यांना शोक अनावर झाला आहे. दरम्यान त्यांच्या पार्थिवावर आज बुधवार दि.१८ रोजी दुपारी मूळगावी वाळकी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

गेल्या तीन महिन्यापूर्वी त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात मानेसह पाठीच्या मणक्यावरील शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या दरम्यान त्यांना न्युमोनिया झाल्याने त्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी बेळगाव येथील केएलई. रुग्णालयात गेल्या महिन्यात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारासाठी अल्प प्रतिसाद मिळाल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

एक मराठा समाजाचा आश्वासक चेहरा म्हणून यांच्याकडे पाहिले जात होते.विशेष म्हणजे कर्नाटकसह महाराष्ट्रातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असून अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.त्यांच्या पश्चात मुलगा मुलगा सुजय,सून उमा,नातू राघवेंद्र,नात संस्कृती,मुलगी सुप्रिया,जावई दत्तकुमार यांच्यासह दोन भाऊ,भावजय,तीन बहिणी, पुतणे,नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान आज बुधवार दि. १८ रोजी सकाळी १० वा. म्युन्सिपल हायस्कूल ते जत्राट वेसपर्यंत त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर त्यांच्या मूळगावी वाळकी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा