आंतरराष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडी येथील खेळाडूंनी केले यश संपादन
सावंतवाडी
सांगली येथील नुतन बुद्धिबळ मंडळाने आयोजित केलेल्या कै. बाबूकाका शिरगावकर आंतरराष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकॅडमीच्या खेळाडूंनी यश संपादन केले.
सिंधुदुर्गचे आघाडीचे राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर आणि १४ वर्षीय राष्ट्रीय खेळाडू विभव राऊळ यांनी स्पर्धेत अनुक्रमे १८वा आणि २४वा क्रमांक पटकावला. नऊ राऊंडमध्ये या दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी सहा गुणांची कमाई केली. ॲकॅडमीचा ५०% दृष्टिदोष असलेला १९ वर्षीय राष्ट्रीय खेळाडू मयुरेश परुळेकर याने पाच गुण मिळवून आपल्या गटात द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच १४ वर्षीय राष्ट्रीय खेळाडू यथार्थ डांगी याने पाच गुण मिळवत १३ वर्षांखालील गटात चौथा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत मुक्ताई ॲकॅडमीचा १३ वर्षीय विद्यार्थी पुष्कर केळुसकर याने आपल्या दुसऱ्याच रॅपिड रेटिंग स्पर्धेत सहभाग घेऊन आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळवले. त्याने दोन रेटेड खेळाडूंना हरवून आणि एका रेटेड खेळाडूसोबत बरोबरी साधून एकूण ४.५ गुणांची कमाई केली.
या विद्यार्थ्यांना मुक्ताई ॲकॅडमीचे अध्यक्ष व प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर आणि राष्ट्रीय प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे यांचे मार्गदर्शन लाभले. युवराज लखमराजे भोसले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
