You are currently viewing तडजोड

तडजोड

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*तडजोड*

 

सध्या दहावी, बारावी हे निकाल लागलेले आहेत. बातम्यात पेपरात किंवा कूठेही नको ते ऐकायला मिळते. पोटात खड्डा पडतो.

अजुन जग काय आहे?हे पाहिलेलंही नाही…. आणि सरळ आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतात. एवढा धीटपणा येतो कूठुन?

इतकं सोप्पं आहे का फांस लाऊन‌घेणे?

आपलं पालन पोषण करणारे जन्मदाते ….. यांच्यावर विश्वास नसेल का,?

त्यांच्या दु:खाची कल्पना नसेल का?

बरं!हे असं अघोरी कृत्य करताना अर्धवट काही झालं आणि जन्माचे वैगुण्य येईल ही भिती पण नसेल?

हे प्रश्न आपल्याला पडतात मग जे या नको त्या मार्गाला जातात त्यांचे काय?

खरं तर हल्ली स्पर्धाच खुप वाढलेली आहे. प्राणावर बेतलेली आहे.

दोन्ही परिक्षा देताना दहावीच्या आधीच मुलांना शाळेत व घरी मनाची तयारी, सहनशीलता, अपयश पचवणे, तडजोड ,विवेक सज्ञनशीलता … अशा अनेक गोष्टींवर ९ वीपासुनच भर द्यायला हवा.

कमी मार्क्स पडले तर पुढे काय करायचे याचीच माहिती व तयारी पालकांनी, शिक्षकांनी करून घ्यायला हवी.

मन पुढच्या लढाईसाठी सज्ज करायला हवीत.

या यश अपयशा पेक्षाही आपल्याला मिळालेले आयुष्य हे खुप सुंदर आहे. अनमोल आहे.

आपण आपल्या आईवडिलांचे जिवनच आहोत. त्यांना दु:खदेण्याचा आपल्याला हक्क नाही.

संघर्ष करूया… जिद्द ठेऊया.. मेहनत अधिकची करूया… पुन्हा यश मिळवूया…. असा विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे.

पालकांनी प्रथम आपले पाल्य व नंतर त्याचे यश व त्याची शक्ती, कुवत याचा विचार करावा.

अपयश पचवायला शिकले पाहिजे. आयुष्यात अशावेळी मनावर संयम ठेऊन संघर्ष करायला शिकवले पाहिजे.

काही ही करून प्रथम जगले पाहिजे.

काय सांगावं? पुढील जन्मी याहुनही खडतर नशीब असलं तर!

आहे हेच बरं म्हणायची वेळ येईल.

सातत्य जिद्द व मेहनत यांच्यासह विवेकाने मार्ग चालत राहिलं तर आज ना ऊद्या यश मिळणारच.

पण हे कोणी करत नाही. फक्त मार्कांची अपेक्षा डोक्यावर मारली जाते. नाही मिळाले तर दुसर्या मुलांशी तुलना करत हिणवले जाते.

आपल्या मुलामुळे आपण स्पर्धेत मागे पडलोय हे पालकांनाच स हन होत नाही व ते पाल्याला धीर देण्याऐवजी तोच कसा चुकला हे दाखवत रहातात.

आपली लढाई आपणच लढली पाहिजे. कष्ट इतके दिवस माहित नसले तरी आता लाडाकोडाचे दिवस संपुन प्रसंगाशी दोन हात करायला शिकले पाहिजे. हे मुलांना कोणी समजावत नाही.

आयुष्याच्या लढाईत कोणतेही गाईड ऊपयोगी पडत नाही. विवेक व संयम यांसह .. ‘तडजोड’.. करायला पाहिजे हे पाल्यांना कोणी शिकवत नाही.

पूर्वी च्या काळात शिक्षण इतकं सज्ञज सोपे नव्हते. माधुकरी मागुन, गुरूगृही काम ,गुरूसेवा करून लांबवर चालत जाऊन, कूठेतरी एकटं राहुन अशा अनेक अडचणींवर मात करत शिक्षण मिळे पण मुलं आयुष्याच्या लढाईत नक्कीच यशस्वी होत.

आता संवाद, संघर्ष, तडजोड सगळंच खुप मागे पडलंय. आणि स्पर्धा, इर्षा, अहंकार दिखाऊपणा हे माणसाबरोबर आहेत.

यावर ऊपाय पालक, शिक्षकांनी हुषार मुलांच्या मागे न लागता सामान्य मुलांना संवादातुन तडजोड करायला शिकवले पाहिजे.

स्पर्धा इर्षा व अहंकारातुन एक पाऊल मागे आले पाहिजे व आपले पाल्य जिवनसंघर्षात कसे यशस्वी होईल, टिकेल ह्याकडे लक्ष दिले पाहिजे.

निदान काही मुलं तरी असं दुसरं टोक गाठण्यापासुन परावृत्त होतील.

 

अनुराधा जोशी.

अंधेरी, मुं. 69.9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा