एक जिल्हा एक उत्पादनांच्या (ODOP) वेष्टनांवर (पॅकेजिंग) वर अधिकृत लोगोचा वापर करावा – जिल्हाधिकारी अनिल पाटील
सिंधुदुर्गनगरी
एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड अल्फान्सो मँगो आणि प्रोसेसड कॅश्यू या दोन उत्पादनांचा समावेश झालेला आहे. आपल्या जिल्ह्यातील सर्व ODOP उत्पादन विक्रेते, औद्योगिक समूह (क्लस्टर) आणि उद्योग घटकांनी त्यांच्या उत्पादनांच्या पॅकेजिंग वर अधिकृत लोगोचा वापर करावा. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हापूस आंबा व काजू प्रक्रिया या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना स्थानिक व जागतिक बाजारपेठ मिळण्यास सहकार्य मिळेल. यामुळे ग्राहकांमध्ये उत्पादनाची दृश्यमानता (Visibility), गुणवत्ता आणि खरेपणाची ओळख निर्माण होईल. तसेच ODOP उत्पादकांना बाजारपेठ मिळण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले.
भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामार्फत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ODOP) उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याने एक जिल्हा एक उत्पादन ODOP उपक्रमास चालना देण्यासाठी सक्रीय सहभाग नोंदविला असून राज्यामार्फत सर्व ३६ जिल्ह्यामधून ७२ प्रमुख ODOP उत्पादने अधिसूचित केली आहेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १. देवगड अल्फान्सो मँगो, २. प्रोसेसड कॅश्यू असे दोन ODOP उत्पादने अधिसूचित केले आहेत.

